॥दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा॥
संस्थानसंबंधी विविध सूचना येथे प्रसारित करण्यात येतील.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

श्रीपाद श्रीवल्लभ

भगवान दत्तात्रेयांचा कलियुगातील पहिला अवतार म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ. आंध्रप्रदेशातील पीठापूर या गावी श्री आपळराज व सुमती हे दांपत्य राहात होते. ते उभयता परम दत्तभक्त होते. श्रीदत्तप्रभूंच्या पुजेत रममाण होण्यातच त्यांचे दिवस जात होते. एकदा त्यांच्या घरी ब्राह्मण – याचकाचे रूप घेऊन भगवान श्री दत्तप्रभूंनी भिक्षेसाठी येणे केले. पण त्या दिवशी आपळराजांच्या घरी श्राध्द होते. तरीही सुमतीने अतिथीला विन्मुख पाठवायला नको म्हणून भिक्षेकरूच्या वेषात आलेल्या श्री दत्तप्रभूंना भिक्षा वाढली. सर्वांतर्यामी, सर्वव्यापी, भगवतांनी सुमतीची भक्ति ओळखून अत्यंत प्रेमाने, मातृभावाने त्या साध्वीचा हात धरला व तिला आपल्या त्रैमूर्त्यात्मक रूपाचे दर्शन दिले व म्हणाले की, “हे माई, श्राद्धाच्या दिवशी, देव आणि पितरांसाठी निमंत्रित केलेल्या ब्राह्मणांचे भोजन होण्याआधीच हा ब्राह्मण हव्य आणि कव्य यांचा भोक्ता विष्णु आहे अशा पवित्र भावनेने भिक्षा वाढली, त्याने मी संतुष्ट झालो आहे. इष्ट तो वर मागून घे.” त्यावर सुमतीमाता दत्तात्रेयांना म्हणाली की, “आपण मला जी आई म्हणून हाक मारलीत तिला सत्यत्व यावे व सर्व लोकांना पूज्य असेल अशा सुपुत्राचे मातृत्व मला शिघ्र प्राप्त व्हावे.” त्यावर दत्तप्रभू म्हणाले की, “तुला माझ्यासारखाच पुत्र होईल. त्याच्या वचनाचे तु कधी उल्लंघन करू नकोस.” एवढे बोलून भगवान अंतर्धान पावले. सुमतीने ही हकिकत आपळराजांना सांगितली. तेव्हा दोघांच्याही आनंदाला पारावार राहिला नाही. पुढे सुमतीला नऊ मासांनी पुत्ररत्न प्राप्त झाले. या बाळाच्या पत्रिकेतील सर्व ग्रह शुभ आणि उच्च प्रतीचे होते. त्याच्या पायावर वज्र, अंकुश, ध्वज, पद्म इ. शुभ चिन्हे होती. त्यावरून या बाळाचे नाव श्रीपाद असे ठेवण्यात आले. आपळराजांनी जातकर्मापासुन सर्व संस्कार शास्त्राप्रमाणे पार पाडले व योग्य वयात या बालकाची मुंजही केली. या बालकाला वेदांचे आणि शास्त्रांचे स्वयंभू ज्ञान असल्याने, त्यानेच इतरांना शिक्षण द्यायला प्रारंभ केला व आपल्या कर्तृत्वाने सुमतीमाता व आपळराजांना खुप आनंद दिला मात्र जेव्हा आई-वडीलांनी विवाहाची गोष्ट काढली. तेव्हा श्रीपादांनी विरोध केला.

ते आपल्या आई-वडीलांना म्हणाले की, “अध्यात्मयोगाला सहाय्यभूत होणाऱ्या श्रेयरूप कल्याणकारी लक्ष्मीचा मला अंगीकार करायचा आहे. म्हणून मी संन्यास घेतो आहे.” श्रीपादांच्या या सांगण्याने सुमतीमाता व आपळराजांच्या डोळ्यात आसवांच्या धारा लागल्या व ते श्रीपादांना म्हणाले की, “आपण साक्षात भगवान विष्णु आहात. आपण अतीन्द्रिय असूनही आमच्या पुर्वपुण्याईने पुत्र या नात्याने आम्हाला दर्शन दिलेत. आता आम्हाला असे शोकसागरात टाकुन कसे जाता? आपण गेल्यास आमचे व आपल्या आंधळ्या व पांगळ्या भावांचे कसे होईल?” तेव्हा श्रीपादांनी आपल्या हाताचा स्पर्श त्या अपंग भावांना केला व त्यांचे अपंगत्व दूर केले.

सुमतीमातेला पुन्हा आपल्या स्वरूपाचे दर्शन दिले व बोध केला. “आपले भाऊ हे षतायुषी होतील. आई-वडीलांची सेवा करण्यास तत्पर असतील. तसेच विद्या, पुत्र, प्रपौत्र इत्यादिंनी समृध्द असतील”, असा वर दिला. अशा प्रकारे माता-पित्यांचे सांत्वन करून त्यांनी माता-पित्यांना तीन वेळा सव्य प्रदक्षिणा घातली आणि त्यांची अनुज्ञा घेऊन श्रीपाद-श्रीवल्लभ काशी आणि बदरिनाथास जायला निघाले. काशी आणि बदरिकाश्रमाची यात्रा करून साधूंचा उद्धार करावा या इच्छेने ते गोकर्णाला गेले. येथे साक्षात श्रीगणेशांनी शैव लिंगाची स्थापना केलेली आहे. या क्षेत्री काही काळ वास्तव्य करून ते कृष्णाकाठी असलेल्या कुरूगड्डी येथे गेले व पुढे याच ठिकाणी अदृश्य झाले.

कुरवपुरात एक ब्राह्मण राहात होता. त्याच्या पत्नीचे नांव अंबिका होते. या दांपत्याला एक मुलगा होता. पण तो मंदमती होता. आठव्या वर्षी त्या मुलाची मुंज त्या ब्राह्मणाने केली व पण त्या पुत्राला गायत्रीमंत्राचा साधा उच्चार करता येत नव्हता. त्यामुळे त्या विद्यासंपन्न ब्राह्मणाला मंदमती मुलगा पाहून विषाद वाटत असे व तो मुलाला मारीत असे. अशा वेळी ती माता व त्या मुलाला मारू नये म्हणून ब्राह्मणाला थोपवित असे. पुढे तो ब्राह्मण मृत्यू पावला व या दोघांवर भिक्षा मागून उदरनिर्वाह करण्याची वेळ आली म्हणून त्या गावातील इतर ब्राह्मण या माय लेकरांची टिंगल करू लागले. त्यांच्या या निंदने कंटाळून या माय-लेकारांनी कृष्णेत जीव देण्याचा निश्चय केला व ते तसे करण्यासाठी निघाले. इतक्यात श्रीपादप्रभूंनी त्या माय लेकरांना पाहिले व आत्महत्या करण्याचे कारण विचारले. तेव्हा त्या आईने आपली व्यथा श्रीपादांकडे उघड केली. श्रीपादांनी त्या मातेची समजूत काढली व “शंकराला उपासनेने प्रसन्न करून घेशील तर जन्मांतरी तुला चांगला मुलगा होईल” असे सांगितले. तेव्हा तसे करण्याची इच्छा तिने व्यक्त केली पण “ह्या मंदमती मुलासह हे कष्टमय आयुष्य कसे घालवावे”, असे विचारून, “आपणच मला आई समजून माझे रक्षण करावे” अशी ती माता मोठ्या काकुळतीने श्रीपादांना म्हणाली. तिची ती भाव-व्याकुलता पाहून श्रीपादप्रभू प्रसन्न झाले व त्यांनी ॐ असे म्हणून आपला हात त्या मंदमति मुलाच्या मस्तकावर ठेवला. तात्काळ तो मुलगा बृहस्पतिसारखा वेदशास्त्रसंपन्न झाला. त्याने अत्यंत, भारावून जाऊन श्रीपाद प्रभूंना नमस्कार केला. श्रीपादांनी त्या मातेस आदेश दिला की “आता सर्व दु:ख विसरून भगवान शंकरांच्या पुजेत उर्वरित आयुष्य व्यतीत कर म्हणजे पुढच्या जन्मात तुला माझ्यासारखाच पूज्य पुत्र प्राप्त होईल.” तेव्हा कृतकृत्य होत ती दोघे घरी परतली व दिलेल्या वचनाप्रमाणे त्या मातेने पुढे आयुष्यभर शंकराची आराधना केली.

श्रीपाद श्रीवल्लभांचा निस्सीम भक्त असणारा एक ब्राह्मण होता. तो चरितार्थासाठी व्यापार करीत असे. एकदा त्याने व्यापारात मला भरपुर नफा झाल्यास श्रीपादप्रभूंना कुरूगड्डीस जाऊन ब्राह्मण भोजन घालून संतुष्ट करीन असा नवस केला. पुढे त्याना व्यापारात भरपुर पैसा मिळाला. त्या नुसार आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी पैसा घेऊन, तो ब्राह्मण कुरूगड्डीला निघाला. त्याला असे करतांना काही चोरांनी पाहिले व त्यासोबत मैत्रीचे नाटक करून त्याला जंगलात एका निर्जनस्थळी नेऊन मारून टाकले. त्या वेळी एकाएकी श्रीपादप्रभू तेथे प्रकट झाले व त्यांनी आपल्या तीक्ष्ण त्रिशुलाने त्या चोरांना ठार मारले. त्या पैकी एकाला मात्र तो चोर नसल्याने त्यांनी मारले नाही. त्याच्या समक्ष चोरांनी मारलेल्या त्या व्यापारी ब्राह्मणाचे डोके धडाला जोडून भस्मयुक्त मंतरलेल्या पाण्याने त्याला जिवंत केले. आपल्या निस्सीम भक्ताचे प्राण पुन्हा परत आणवून श्रीपादप्रभू गुप्त झाले. आपल्याला प्रत्यक्ष श्रीपाद प्रभूंचे दर्शन घडले नाही. याची खंत त्या ब्राह्मणाला वाटली. तो कुरूगड्डीला गेला तेथे त्याने मोठ्या भक्तिभावाने चार हजार ब्राह्मणांना भोजन घातले. श्रीपाद श्रीवल्लभांच्या प्रसादाने त्या ब्राह्मणाचे ऐहिक व पारलौकिक कल्याण झाले. श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू गुप्त झाल्यानंतरही अशा कित्येक घटना घडलेल्या आहेत. एवढेच नव्हे तर कृष्णातीरीचे हे कुरूगड्डी भक्तांना शीघ्र मोक्षरूपी फळ प्रदान करणारे असे महान स्थान आहे. म्हणूनच श्रीमत् प.प.स.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी करुणात्रिपदीमध्ये “श्रीगुरुदत्ता जयभगवंता, ते मन निष्ठुर न करी आता। चोरे द्विजासी मारिता मन जे, कळकळले ते कळकळो आता॥” अशी आर्तभावाने श्रीपादप्रभूंची प्रार्थना करून त्यांच्या भक्तवात्सल्याचा लाभ सर्वांना आपल्या आयुष्यातही कसा करून घेता येईल याची काळजी घेतलेली आहे.

॥श्रीपादराजं शरणं प्रपद्ये॥

Contact us
If you are interested or have any questions, send us a message.
I am very interested
Send Message