॥दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा॥
संस्थानसंबंधी विविध सूचना येथे प्रसारित करण्यात येतील.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु श्री योगानंद सरस्वती स्वामी महाराज

अहो साधुपुरुषा लागुन। कैचा जन्म कैसे मरण।

परि व्हावे लोककल्याण। या कारणे ऐसी लीला॥

वरील सिद्धांताला अनुसरून तलंगपूर या गुजरात राज्यातील छोट्या गावामध्ये प.प.स.योगानंद स्वामी महाराजांनी, शके १७९० मध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेस दत्तजन्माचे वेळी मानवी रूपाने अवतार धारण केला. त्यांच्या आईचे नांव सौ.काशिबाई होते व वडीलांचे नांव श्री डाह्याभाई होते.

तलंगपूरमध्ये शंकरजी लालाभाई देसाई यांचे कुटुंब राहात होते. त्यांचे गोत्र कौलश असून, इष्टदेवता श्री नीलकण्ठेश्वर होती आणि कुलदैवत श्री शुक्लेश्वर महादेव, श्रीक्षेत्र अनावल हे होते. शंकरजी यांचे कुटुंब सुशील धर्मपारायण व आहे त्यात समाधान मानणारे होते. ते कर्मठ असून कट्टर शिवभक्त होते. दररोज भगवान श्री नीलकण्ठेश्वराची पूजा करणे हा त्यांचा नित्यनियम होता. घरी शेती होती. स्वतःच्या गरजा भागवून, धर्मकार्यासाठी दानधर्म देण्याइतपत सुबत्ता होती व मनाचे मोठेपण होते. रंजल्यागांजल्यांविषयी अंत:करणात अपार करुणा दाटलेली होती. त्यांना खंडुभाई, सुंदरभाई व डाह्याभाई ही तीन मुले होती. त्यापैकी डाह्याभाई हे सद्गुरुंचे पिता होते.

डाह्याभाईंचे आचरणही वडीलांच्या पावल्यावर पाय टाकल्याप्रमाणे होते. त्यांच्यामध्ये शंकरजींचे संस्कार पूर्णपणे उतरले होते. ते देखील कट्टर शिवभक्त होते.

त्यांनी आपल्या घराण्यात चालू असलेली शिव आराधना तेवढ्याच निष्ठेने पुढे चालू ठेवली होती. त्या काळच्या चालीरीतिप्रमाणे त्यांचा विवाह संस्कार योग्य वयात झाला. सौ.काशिबाई ह्या एक कुशल गृहिणी होत्या. पण अध्यात्म साधनेतही त्यांनी डाह्याभाईंना तितक्याच उत्कटतेने साथ दिली. या उभयंताचा शिवरात्र व्रत करण्याचा नियम होता. धर्मानुसार नित्य आचरण करीत आणि अनन्यभावे शिवोपासनेत रत होत होत डाह्याभाई व सौ.काशिबाईचा संसार सुखाने चालला होता. कालांतराने त्यांच्या संसारवेलीवर जमुनाबेन व देवीबेन या मुलींच्या रूपाने दोन कळ्याही उमलल्या. त्यानंतर पुत्ररत्न लाभावे अशी उभयतांची इच्छा होती. भगवान, नीळकण्ठेश्वराला त्यासाठी साकडेही घातले होते. त्यामुळे श्रीदत्तजयंतीच्या दिवशी दत्तजन्माच्या वेळीच पुत्ररत्न प्राप्त झाल्याने देसाई परिवार आनंदाने न्हाऊन गेला.

बाराव्या दिवशी ज्योतिषाला बोलावण्यात आले. पंचांगानुसार त्याने बाळाचे जातक पाहिले. ग्रहानुसार फलश्रुती सांगितली की, मुलगा कुळाचा उद्धार करील. संसारसागरात बुडालेल्या आर्तजनांचे दु:ख दूर करील. ज्योतिषाची ही भविष्यवाणी ऐकून देसाई कुटुंबाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. मुलाचे नांव कल्याण ठेवले. हा कल्याण म्हणजेच, लोककल्याण करण्यासाठी पृथ्वीतलावर मानवी रूपात अवतार धारण करून, आपल्या दिव्य वाणीने व अलौकिक कृतीने समाजात धर्म जागरण घडवून आणणारे, गुरुदेव श्री.प.प.स. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे पट्टशिष्य श्री.प.प.स.योगानंद सरस्वती स्वामी महाराज (गांडा महाराज) होत.

त्यांचे बालपण इतर लहान मुलांच्या तुलनेत वेगळे होते. बालपणापासूनच त्यांना शिवपूजनाची गोडी होती. खेळण्याबागडण्याच्या वयात एकांतात रमण्याची त्यांची वृत्ती दिसत होती. त्यामुळे घरातील वडीलधाऱ्यांनी लाडाने त्यांचे नांव गांडा असे ठेवले. (गुजराती भाषेत गांडा या शब्दाचा अर्थ भोळा असा होतो.) बघता बघता कल्याणजी आठ वर्षांचे झाले. त्यामुळे श्री डाह्याभाईंनी मोठ्या उत्साहाने त्यांचा यज्ञोपवित संस्कार सोहळा पार पाडला. देवपूजेत रमण्याची वृत्ती आधीच होती. मौंजीबंधनानंतर तर कल्याणजींचे वागणे आणखी बदलले. स्नानसंध्यादि कर्मे, रूद्र अभिषेक, शिवपूजा या सर्वांचे नित्य नियमाचे पालन करण्यात त्यांना अधिकाधिक गोडी वाटू लागली. त्याकाळी शिक्षणाचा प्रसार झालेला नव्हता. तलंगपूर येथे एक गावठी शाळा होती. त्या शाळेतच कल्याणजींचे शिक्षण झाले. व्यवहारासाठी आवश्यक असणारे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या , लौकिक शिक्षणाची इतिश्री झाली. त्यानंतर सद्ग्रंथांचे वाचन करण्याचा छंदच त्यांच्या मनाला लागला. यातून अनेक ग्रंथाचे वाचन घडले. पूर्वजन्मीच्या संस्कारांनी चित्त शुद्ध होतेच, त्यात अशा धार्मिक संस्काराची व कृतीची जोड मिळाली.

त्या काळच्या प्रथेप्रमाणे कल्याणजींचे लग्न सौ.केसरबाई यांच्याशी झाले. अर्थात् हा त्या वेळच्या रूढीप्रमाणे बालविवाह होता. पुढे वय वाढले तशी कौटुंबिक, जबाबदाऱ्यांची जाणीव कल्याणजींच्या मनात झाली. कुटुंबाच्या मिळकतीत हातभार लावावा म्हणून सचिन संस्थानातील एका शाळेत शिक्षकाची नौकरी त्यांनी पत्करली. प्रमाणिकपणाने अध्यापनाचे कार्य करावे आणि उरलेल्या वेळात शिव-आराधना व धार्मिक ग्रंथाचे वाचन करावे असे दिवस जाऊ लागले. संसारही जगरहाटीप्रमाणे चाललेला होता. पुढे डाह्याभाईंनी त्यांना शिक्षकाची नौकरी सोडून शेतीच्या कामात लक्ष घालण्याची आज्ञा केली. त्यानुसार कल्याणजींनी शिक्षकाची सोडली व ते शेतीच्या कामात लक्ष घालू लागले. शेतीची कामे करावीत आणि उरलेल्या वेळी भगवान नीळकण्ठेश्वराची आराधना करावी असा कल्याणजींचा दिनक्रम सुरू झाला. तसा त्यांच्या मनात प्रापंचिक गोष्टींना थारा नव्हता. मन शिव-आराधनेत तल्लीन होऊ पाहत होते. म्हणूनच श्री नीलकण्ठेश्वराची षोडशोपचारे पूजा करण्याचा त्यांचा नियम कधीच चुकत नव्हता. प्रतिवर्षी श्रावणमासात सव्वालक्ष बिल्वपत्रे महादेवास अर्पण करण्याचा नियम कटाक्षाने पाळला जात होता.

एकदा शिवरात्र व्रतामध्ये अडथळा येण्याचा प्रसंग उद्भवला. तलंगरपूरपासून वीस-पंचवीस मैल दूर असलेल्या पिंपळदरा या गावी कल्याणजींच्या भाच्याचे लग्न होते. त्यासाठी त्यांना जावे लागले. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच शिवरात्र होती आणि शिवरात्रीस, मध्यरात्री शिवपूजन करण्याचा त्यांचा नियम होता. तलंगपूरला पोहोचता आले नाही तर इतके दिवस निष्ठेने पाळलेले शिवरात्र व्रत भंग होणार होते. आजच्या सारखी प्रवासाची साधने त्या काळी नव्हती. त्यामुळे लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच गावाकडे परत जाण्याचा निश्चय कल्याणजींनी केला. दुसरे दिवशी पायी निघून ते अमलसाड स्टेशनवर आले, पण गाडी निघुन गेली होती. अन्य कोणतेही प्रवासाचे साधन नव्हते. त्यांनी शरीरास पडणाऱ्या कष्टांचा विचार केला नाही. सरळ पायी चालत २० मैलांचे अंतर कापून कल्याणजी रात्री अकरा वाजता तलंगपूरास पोहोचले. मध्यरात्री भगवान नीळकण्ठेश्वराची प्रतिवर्षाप्रमाणे त्यांनी यथासांग षोडशोपचारे पूजा केली. केलेला नियम कोणत्याही परिस्थितीत पाळणे हे त्यांचे ब्रीदच होते.

वडीलांच्या इच्छेनुसार शेतीचा व्यवसाय त्यांनी स्विकारला असला तरी मन त्यात रमत नव्हते. आध्यात्मिक उन्नती कशी साधता येईल हाच ध्यास मनास लागला होता. संतसहवासाशिवाय आत्मिक उन्नतीचा मार्ग सापडणार नाही हे सत्य चिंतनानंतर त्यांना कळून आले. त्यासाठी तलंगपूर कसे सोडता येईल याचा विचार कल्याणजींनी मनात सुरू झाला. पुढे तसा एक योगही जुळून आला. रांदेर या सुरत शहरातपासून जवळ असलेल्या गावाच्या एका व्यापाऱ्याची आफ्रिेकेत पेढी होती. त्यासाठी त्याला एक नोकराची गरज होती. वार्षिक १०००/- रूपये वेतन देण्यास तो तयार झाला, पण ही नोकरी परदेशात होती. परदेशात जाऊन नोकरी करणे डाह्याभाईंना पटले नाही. त्यांनी कल्याणजींना सांगितले की, शेतीचे काम तुला रुचत नसेल तर तू नोकरी कर पण ती आपल्या देशातच असली पाहिजे. वास्तविक कल्याणजींना हेच पाहिजे होते. अशा पद्धतीने त्यांनी वडीलांकडून नोकरीसाठी घर सोडण्याची आज्ञा मिळवली व तलंगपूरपासून दूर मद्रास येथे नोकरी स्विकारली पण त्यांना देवीबहेनजींचे पति परामजी खरसाडकर यांना देवाज्ञा झाल्याची वार्ता कळाल्याने पुन्हा तलंगपूरला यावे लागले. कल्याणजी वडीलांना धीर देण्यासाठी तलंगपूरहून निघाले. मद्रासला जाण्यासाठी त्यांनी मुंबई स्टेशन गाठले पण तेथे त्यांना एका जुगाऱ्यांच्या टोळीने गाठले व जुगारात हरवून त्यांच्याकडचे सगळे पैसे घेतले. त्यामुळे कल्याणजींनी मद्रासला पायी जाण्याचा मार्ग स्विकारला. रस्त्यात चोरांनी त्यांच्या हातातले सोन्याचे कडेही काढून घेतले. जवळ पैसा नव्हता. कुणाची सोबत नव्हती, तरीही शांतचित्ताने भगवान शिवशंकरांचे ध्यान करीत कल्याणजी मार्ग आक्रमित होते. वाटेत अनेक अडथळे आले. संकटे उद्भवली पण त्यांना न जुमानता त्यांचा प्रवास चालू होता. असेच प्रवास करीत करीत ते नाशिकला पोहचले.

नाशिकला संत सहवासात राहण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली. एका महात्म्याचा सहवास त्यांना लाभला. संत सहवासाने त्यांचे मन अत्यानंदाने भरून गेले. प्रवासाने आलेला शीण, थकवा कुठल्याकुठे पळून गेला. भूक, तहानही ते विसरून गेले. या काळात त्यांनी त्या संत महात्म्याची अनन्यभावे व नि:स्वार्थवृत्तीने सेवा केली. अशा एकनिष्ठ सेवेमुळे त्या संत महात्म्याला परम संतोष वाटला. त्यांनी कल्याणजींना रामेश्वराची पायी यात्रा कर म्हणजे आत्मिक सन्मार्गाचा लाभ होईल असे मार्गदर्शन केले. त्यानुसार संताचा आशिर्वाद घेऊन ते पायीच रामेश्वरला जाण्यासाठी निघाले. अन्नपाणी दिवस दिवस मिळत नव्हते. प्रसंगी उपाशी राहून प्रवास करावा लागत होता. अशा कठीण परिस्थितीतही त्यांचे मन शांत होते. इष्टदेवतेला स्मरून वाटचाल चालू होती. असे करीत ते वळवनूर गावी पोहचले. तेथे कल्याणजी ज्या पेढीवर नोकर होते त्या पेढीची एक शाखा होती. त्या पेढीवरील एका मुनीमाने कल्याणजींना ओळखले. त्यांच्या शरीराची प्रवासाने झालेली अवस्था पाहून रामेश्वराची यात्रा करायची असेल तर थोडे दिवस नोकरी करीत थोडा पैसा जमल्यावर जाता येईल असा विचार मुनीमाने कल्याणजींना सुचविला. शरीराला विश्रांतीची गरज होती. त्यामुळे कल्याणजीनी तो विचार स्विकारला व पुन्हा मद्रासमध्ये नोकरी सुरू झाली. सौ.केसरबाईंनाही तलंगपूरहून बोलावले व संसार पुन्हा सुखाने सुरू झाला. पण पुढे त्या पेढीच्या मालकाने कल्याणजीवर काही आळ घेतल्याने त्यांनी तात्काळ त्या नौकरीचा त्याग केला व ते तलंगपूरला परतले. त्यानंतर त्यांनी तलंगपूर येथे कपड्याचे दुकान टाकले पण त्यात फायदा झाला नाही. उधारी थकल्यामुळे दुकान बंद करावे लागले. पुढे कल्याणजींनी चुलत भावाबरोबर भागिदारी करून निकोरा या गावी गुळ व तंबाखूचा व्यापार सुरू केला. सौ.केसरबाईसह निकोरा येथे घरही थाटले. तेथे त्यांचा व्यापार जोरात चालू लागला. पैसा हाती येत होता पण लागलीच खर्चही होत होता. व्यापारी वृत्तीने पैशाचा धनसंचय करण्याची मुळातच त्यांची वृत्ती नसल्याने दीनदुबळ्यांना, गरजू लोकांना दान दिले जाई. तसेच नर्मदा परिक्रमा करणाऱ्या साधु संतांची ये-जा या भागात नेहमी असे त्यांच्यासाठी खर्च करण्यात ते मागे पुढे पाहात नसत. कल्याणजींनी चालविलेला खुला खर्च पाहून सौ.केसरबाईंना वाईट वाटायचे. अशाने कसा व्यापार होणार? एक दिवस कंगाल व्हावे लागेल असे त्यांना वाटू लागले. म्हणून त्यांनी श्री डाह्याभाईंना एक विस्तृत पत्र लिहिले. त्यामुळे डाह्याभाईंनी निकोरा येथे येऊन कल्याणजींची कानउघाडणी केली. त्यांचे मन उदासीन झाले. घर कसे सोडावे याची योजना मनात त्यांनी आखली. थकलेली उधारी वसूल करण्याच्या निमित्याने त्यांनी निकोरा सोडले. प्रथमच सगर्भा असलेल्या पत्नीची अभिलाषाही त्यांना मागे रोखू शकलि नाही. प्रवास करीत करीत ते नर्मदा किनारी येऊन पोहचले. त्यांनी नर्मदामातेची अनन्यभावाने प्रार्थना केली. “माते मी तुला शरण आलेलो आहे. तारायचे असेल तर तार अथवा मार ! सन्मार्ग दाखव.” अंगावरील कपड्यांचा मोह तरी का असावा असे म्हणून कपडे नर्मदा मातेच्या प्रवाहात सोडून दिले. जवळ फक्त दोन उपवस्त्रे व लंगोट याशिवाय काहीही ठेवले नाही. गुरु प्राप्तीसाठी नर्मदा परिक्रमा करण्याचा निश्चय मनात पक्का केला आणि नर्मदा परिक्रमेचे मूळस्थान अमरकंटक येथे जाण्यासाठी मार्गक्रमण करणे सुरू झाले. शूलपाणीश्वराच्या अरण्यात त्यांना भिल्लांनी लुबाडले. एका लंगोटाशिवाय काहीही शिल्लक ठेवले नाही. अगदी जानवे सुध्दा तोडून घेतले. तेथून प.पू.श्री.महाराज ओंकारेश्वराच्या घनदाट झाडीत आले. तेथे किटीघाटाजवळ असलेल्या मनघाट भैरवाच्या स्थानाजवळ त्यांनी एक पर्णकुटी उभारली. तपश्चर्या सुरू केली. बेलांच्या पानावर निर्वाह करीत गुरुकृपा प्राप्त करून घेण्यासाठी निष्ठेने अनुष्ठान चालले होते. पण सातत्याने उपवास घडत असल्याने शरीर क्षीण झाले होते. नर्मदा मातेने भिल्लांद्वारा सद्गुरुंच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था लावली. दररोज दहा शेर दुध देणारी एक गाय, तिची देखभाल स्वत: करीत, तेथे आणून ठेवली. पुढे आता या अरण्यात राहू नये ते सोडून चालू लागा असा दृष्टांत त्यांना झाला. नर्मदा परिक्रमा करीत असतांना अनेक महात्म्यांच्या मुखातून पांडुरंगबाबा या महान सिद्ध पुरुषाविषयी सद्गुरुंनी ऐकले होते. त्यामुळे ते बागदी संगम येथे पाडुरंगबाबांना भेटण्यासाठी आले. तेथे पांडुरंगबाबांनी “तुमचे गुरु होण्याचे कार्य माझ्याकडे नाही, तुमचे गुरु दक्षिणी ब्राह्मण असून ते अत्यंत तेजस्वी आणि अधिकारी महात्मे आहेत. त्यांचा उपदेश तुम्हाला मिळेल.” अशी भविष्यवाणी वर्तविली. त्याच वेळी पांडुरंगबाबांच्या कुटीत काही दक्षिणी ब्राह्मण योगायोगाने बाबांच्या दर्शनार्थ आले होते. त्यांनी पांडुरंग बाबांचा आणि सद्गुरुंचा संवाद ऐकला आणि ते म्हणाले की, “आपण ज्या महात्म्याविषयी बोलत आहात, ती विभूती नर्मदा किनाऱ्यावर तीर्थयात्रा करीत गुजरात प्रांतात येणार आहे. त्यांच्या जवळ अंगुष्ठप्रमाणाएवढी एक श्रीदत्त प्रतिमा आहे. ती त्या महात्म्याशी साक्षात् वार्तालाप करते असेही ऐकिवात आहे.” या संभाषणाने सद्गुरुंना अत्यानंद झाला. पांडुरंगबाबांना साष्टांग प्रणिपात करून ते लागलीच गुजरातकडे जाण्यासाठी निघाले. दीडशे मैलांचा अथक प्रवास करून सद्गुरु गुजरात प्रांतातील चिखलदा या गावी आले आणि तेथे त्यांना गुरुदेवांचे नाव श्री वासुदेवानांद सरस्वती असे असून ते नर्मदा किनाऱ्यावर परिभ्रमण करीत करीत नुकतेच गुजरात प्रांतात प्रवेशले आहेत अशी वार्ता कळाली. शेवटी शुकदेव, व्यास, अनसूया आदि तीर्थांची यात्रा करीत सद्गुरु सिनोर या गावी पोहोचले.

गुरुदेव श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज मार्कंडेश्वराच्या मंदिरात वास्तव्यास होते. त्यामुळे सद्गुरुंनी तेथे गुरुदेवांना पाहताच त्यांच्या मनात दिव्यानंद दाटून आला. त्यावेळी गुरुदेवांचे गीतेवर प्रवचन चालू होते. अंतर्ज्ञानाने त्यांनी सगळे जाणले पण प्रत्यक्ष ओळख मात्र दाखविली नाही. एक आठवडा असाच गेला. एके दिवशी गुरुदेवांनी “तू येथे का बसून राहतोस?”, असे विचारले. तेव्हा अत्यंत नम्रभवाने “हे समर्थ पाय माझा उद्धार करतील. याच विश्वासाने मी या पायाजवळ शरण आलो आहे” असे गुरुदेवांना विनवले व आपली सारी जीवनकथाही सांगितली. ते गुरुदेवांसोबत अठरा दिवस सिनोर येथे राहिले. या काळात त्यांनी अत्यंत एकनिष्ठेने गुरुदेवांची सेवा केली. गुरुदेवांच्या सान्निध्यात त्यांच्या मनातील विषाद नष्ट झाला व त्यांचे मन अखंड प्रसन्नतेने भरले. आत्मबोधाच्या साक्षात्कारासाठी ऋतंभरा प्रज्ञा जागृत करणे आवश्यक असति. त्या करिता योगाभ्यास करण्याची आज्ञा गुरुदेवांनी केली. मार्कंडेश्वराच्या मंदिरातच त्यांचा योगाभ्यास सुरू झाला.  

 

मार्कंडेश्वराच्या मंदिरात गुरुदेव श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आलेले आहेत. हे जाणून त्यांच्या दर्शनासाठी भक्तांची रांग लागली. राजपिंपळा येथील न्यायाधीश श्री खंडुभाई देसाई जे डाह्याभाईंचे मित्र होते. तेही गुरुदेवांच्या दर्शनाला आले. त्यांनी तेथे सद्गुरुंना गुरुदेवांच्या सेवेत असल्याचे पाहिले व ओळख न देता डाह्याभाईंना पत्र पाठविले. त्यानुसार डाह्याभाईनी आपले जावई श्री कल्याणजी व पुतण्या यांना ताबडतोब सिनोर येथे पाठविले. त्यांनी गुरुदेवांना सगळे सांगितले. गुरुदेवांनी, “गांडा लवकरच तलंगुपरला येईल त्याची काळजी करू नये”, असे आश्वासन दिले.   

सिनोरहून उभय गुरु-शिष्य निकोरा येथे आले. तेथे गुरुदेवांनी गांडामहाराजंकडून योगाभ्यास करून घेतला व पुढे ते समुद्रस्नानासाठी गेले. त्यानंतर गुरुदेवांनी त्यांना घरी जाण्याची व आई-वडीलांची परवानगी घेऊन आपल्याकडे येण्याची आज्ञा केली. त्यानुसार सद्गुरु तलंगपुरला परत आले. सगळ्या परिवाराला आनंद वाटला. पण सद्गुरुंचे मन कुटुंबात रमत नव्हते. गुरुदेवांच्या सहवासाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून एक दिवस त्यांनी वडीलांना कळकळून विनंती केली, “मला येथे येऊन बरेच दिवस झाले आहेत. गुरुदेवांच्या सेवेत हजर होण्याची उत्कंठा मनास लागलेली आहे. मला त्यांच्याकडे जाण्याची अनुज्ञा द्या. माझ्या आत्मोत्कर्षाच्या मार्गात आपण अडथळा आणू नये ही माझी नम्र प्रार्थना आहे.” तेव्हा डाह्याभाईंनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की, “आम्हा उभयतांचा अंत्यसंस्कार तुलाच करावा लागणार आहे. लहान भाऊ व मुलगी या सर्वांचा भार तुझ्यावरच आहे. ते तू का समजून घेत नाहीस?” सौ.केसरबाईंनीही आपले म्हणणे मांडले. सद्गुरुंनी आपल्या वडीलांना समजवले की, “आपण मुळीच काळजी करू नये. गुरुकृपेने सर्व कार्य ठीक होईल. कुटुंबाच्या पालनपोषणाची व माझ्या पत्नी व मुलीची काळजी रघुजी घेईल.” शेवटी त्यांच्या मनाची तळमळ पाहून आई-वडीलांनी त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे करण्याची परवानगी दिली. “आपण जर सकाळी सर्वांसमक्ष घराबाहेर पडू तर सर्वांना दु:खाचा भार पेलणे असह्य होईल. त्या पेक्षा सर्व झोपेत असतांना मध्यरात्री गृहत्याग करून आश्विनीकुमार तीर्थास जावे.” असा विचार सद्गुरुंनी केला आणि रात्री दोन वाजता त्यांनी तलंगूपर सोडले. ते अश्विनीकुमार तीर्थावर आले. तेथे त्यांनी काही दिवस गुप्तेश्वर महादेवाच्या मंदिरात मुक्काम केला तेथून ते भडोच येथे आले. तेथे त्यांनी अभिमुक्तेश्वर मंदिराजवळील धर्मशाळेत साधनेस प्रारंभ केला. गुरुदेवांना एक पत्र लिहिले. त्या पत्राचे उत्तर गुरुदेवांनी पाठविले आणि भडोच येथे दोन महिने राहून चातुर्मास पूर्ण करून व्दारका येथे भेट घेण्याचे सूचित केले. त्यानुसार सद्गुरु व्दारका येथे पोहोचले व त्यांनी गुरुसेवेत स्वत:ला झोकून दिले. एके दिवशी गुरुदेवांनी त्यांना प्रभातपाटण येथे जाऊन बाळंभट पुजारी यांची मुलगी व्दारका हिची समजून घालण्यासाठी जाण्याची आज्ञा केली. तेथून गिरनारची यात्रा करून दिवाळीच्या सुमारास राजकोट येथे भेट घेण्याचे सांगितले. सद्गुरु गुरुआज्ञेस वेदवाक्य समजत असल्याने त्यांनी लगेच व्दारका सोडून प्रभातपाटण गाठले व व्दारकेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तेथून ते गिरनारची यात्रा आटोपून राजकोट येथे गुरुदेवांना भेटले. राजकोट येथून ते सिध्दपूर, जकोर, सिनोर, चिखलदरा, उज्जैन इत्यादी स्थानांहून क्षिप्रा तटावरील महत्पूर या गावी आले. येथेच चातुर्मासासाठी उभय गुरुशिष्यांचा मुक्काम झाला.

गुरुदेवांच्या सान्निध्यात सद्गुरुंना सद्ग्रंथाचे श्रवण आणि मनन घडत होते. शास्त्रप्रणालीनुसार प्रत्यक्ष गुरुमुखातून ज्ञान ग्रहण करण्याचे परमभाग्य त्यांना लाभले होते. गुरु आणि शिष्य दोघेही तेवढेच अधिकारी होते. त्यांचा योगाभ्यासही व्यवस्थित चालू होता. पण ऋतंभरा प्रज्ञा जागृत व्हावी म्हणून गुरुदेवांनी त्यांना खेचरी मुद्रा करण्यास सांगितले. त्यासाठी जिभेच्या खालची एक सुक्ष्म शीर छेदावी लागले म्हणून गुरुदेवांनी त्यांना गुणाछावनी येथे असलेल्या डॉ.विश्वनाथ ताटके यांच्याकडे पाठविले. शीरोच्छेदन करतांना खूप रक्तस्त्राव झाला. शेवटी गुरुदेवांनी येऊन त्यावर उपचार केला. तेव्हाच रक्तस्त्राव थांबला. सद्गुरुंची प्रकृती खालावली. गुरुदेवांनी नंतर ब्रह्मावर्ताकडे प्रयाण केले व सद्गुरु गांडा महाराज भडोच येथे आपल्या बहिणीकडे राहण्यासाठी आले.

गुरुदेवांच्या आज्ञेप्रमाणे खेचरी योगमुद्रेचा अभ्यास चालू होता. गुरुदेवांनी सांगितलेल्या सुचनेप्रमाणे आहार व विहार यांचे नियमन सद्गुरु करीत होते. त्यामुळे प्रकृतीत चांगली सुधारणा झाली व सद्गुरुंनी धर्मजागृतीच्या कार्यास प्रारंभ केला. ते पळसाना, टिंबरवा साकी येथे जाऊन राहिले व तेथील लोकांमध्ये धर्मजागृती केली. तेथून ते भडोच येथे साधनेसाठी परत आले. एके रात्री गुरुदेवांनी स्वप्नात येऊन सांगितले की तुझी माता आणि भावजय यांनी आजारपणामुळे अंथरून धरले आहे. दुसऱ्या दिवशीच सद्गुरु तलंगूपर येथे पोहोचले. त्यांनी आईची सेवा केली. तिच्याकडून दानधर्म करविला. अंतिम क्षणी दत्तप्रभुंचे ध्यान व नामस्मरण करण्यास सांगितले. मातोश्रींनी दत्तनामाचा उच्चार करीत करीत माघ शुद्ध पौर्णिमेस (संवत् १९५९) पार्थीव शरीराचा त्याग करून चिरकाल सौभाग्य प्राप्त केले. त्यानंतर सद्गुरुंनी मातोंश्रीचे उत्तरकार्य व्यवस्थित पार पाडले व त्या वर्षीचा चातुर्मास अश्विनीकुमार येथे केला. संवत १९६२ मध्ये भडोच येथे सद्गुरुंची कन्या हिचा विवाह उंटडी या गावचे मगनलाल खुशालभाई देसाई यांच्याशी झाला. पण पुढे पाणी काढता काढता झोक जाऊन आडात पडल्याने त्या कन्येचे देहावसान झाले. या घटनेमुळे सौ.जमुनाबेन यांना खूप दु:ख वाटले पण सद्गुरुंनी दु:ख केले नाही. शके १८२८ चा चातुर्मास बडवाई येथे गुरुदेव करणार आहेत असे कळल्याने सद्गुरु बडवाई येथे आले तेथून ते वाडीस गेले वाडी येथे बडोद्याचे नोंदणी कामगार आनंदराव खंडेराव शिंदे हे गुरुदेवांना भेटले व त्यांनी गांडा महाराजांसोबत नाशिकची यात्रा करण्याची श्रीदत्त महाराजांची आज्ञा न मिळाल्यामुळे त्यांच्यावर आलेल्या प्रसंगांची उदाहरणे देऊन यावर मार्ग काढण्याची विनंती केली. त्यानुसार गुरुदेवांनी त्यांना श्रीदत्तपादुकांवर महाभिषेक करण्यास सांगितले व गांडा महाराजांना औषध देण्याची आज्ञा केली. त्यानुसार गांडा महाराजांनी शिंदे यांना औषध दिले व ते रोगमुक्त झाले. गुरुदेवांना वाडीहून शृंगेरी येथे जाण्याची श्री दत्तप्रभुंची आज्ञा झाली.  त्यानुसार सद्गुरु गांडा महाराजसोबत गुरुदेव शृंगेरी येथे गेले. तेथून ते अरण्यमार्गाने बनवाशी, शिरसी, गोकर्णमहाबळेश्वर, गुर्लहोसूर या गावाहून गलगळीस आहेत. तेथे दोन महिने मुक्काम केला. येथे श्रीगुरुदेवांनी गांडा महाराजांना सांगितले की पुत्र होत नाही म्हणून तुझ्या मातेने शिवरात्र व्रत केले होते. त्या व्रतानुसारच तुझा जन्म झालेला आहे व सद्गुण प्रधान प्रकृती प्राप्त झाली आहे. म्हणून तू शिवरात्र व्रताचे उद्यापन करून मातृऋणातून मुक्त हो. गुरुदेवांच्या या आज्ञेनुसार शिवरात्र व्रताचे उद्यापन सद्गुरुंनी यथासांग पार पाडले व ते मातृऋणातून मुक्त झाले.

गलगळीक्षेत्राहून गुरुदेव वैशाख वद्य ६ शके १८३३ मध्ये कुरुगड्डी येथे आले. तेथेच त्यांचा त्या वर्षीचा चातुर्मास संपन्न झाला. गुरुदेवांच्या आगमनामुळे येथे भक्तजनांची गर्दी वाढू लागली. एवढ्या मोठया जनसमुदायाचि व्यवस्था ठेवण्याचे कार्य सद्गुरु गांडा महाराजांकडे होते. त्यांनी हे कार्य व्यविस्थितपणे पार पाडले. कुरुगड्डी येथे असतांना एक दिवस गुरुदेवांच्या मस्तकावर एक कावळा बसला. त्याच वेळी श्रीदत्तप्रभुंचा दृष्टांत झाला की दक्षिणेत वाणीसंगम म्हणून स्थान आहे. तेथे जाऊन स्नान केल्यास काकस्पर्श दोषाचा परिहार होईल.

त्यानुसार गुरुदेव व गांडा महाराज वाणीसंगमावर आले. तेथे गुरुदेवांनी काकस्पर्श दोष निवारणार्थ स्नान केले. तेथून ते परळी वैजनाथ, रेणापूर या गावावरून राजूर गावी आले. तेथे सिताराम महाराजांनी यज्ञाचे आयोजन केले होते. तेथे गुरुदेवांची व गांडा महाराजांची उपस्थिती लाभली. राजूरहून ते औंढा नागनाथ येथे गेले. तेथून रूद्र स्वाहाकारासाठी त्यांना गौडगावी जायचे होते. म्हणून ते पाथरीस आले. तेथे गौरीशंकर मंदिरात गुरुदेवांच्या हस्ते चैत्र शुद्ध ३, गुरुवार शके १८३४, या शुभदिवशी दत्तपादुकांची स्थापना झाली. नंतर ते गौडगांवी गेले. तेथे रेणुकामातेच्या मंदिरात स्वाहाकाराचा कार्यक्रम गुरुदेवांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या यज्ञप्रसंगी श्रीश्यामराव चौधरी यांची कन्या सौ.विठाबाई यांच्या मुलीस गुरुदेवांनी जिवंत केले. तेथून गोपेगाव येथे श्रीअप्पादेव व अण्णादेव यांना अरण शिकवण्यासाठी गुरुदेव गेले. तेव्हापासून तेथील लिंबाची पाने गोड झाली. गोपेगावाहून गुरुदेव व गांडा महाराज मंजरथ, राक्षसभूवन, पांचालेश्वर या गावाहून पैठण येथे आले. तेथे नाथवंशजांना श्रींच्या मूळ जागेचे दिग्दर्शन गुरुदेवांनी केले. नंतर हे उभय गुरु-शिष्य देवगिरी किल्यावरच्या जनार्दनस्वामींच्या समाधीचे दर्शन घेऊन वेरूळला गेले. तेथे घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन ते चाळीसगांवचा मार्ग आक्रमू लागले. त्यावेळी गुरुदेवांनी सद्गुरु गांडा महाराजांना सांगितले की, “तू माझ्याबरोबर राहून, दत्तसेवा करून अनंतपुण्य जोडले आहेस. या पुण्यप्रभावामुळे तुला स्वर्गाची प्राप्ति तर निश्चित मिळेल पण मोक्ष प्राप्ती लाभणार नाही.” तेव्हा सद्गुरु गांडा महाराजांनी गुरुदेवांना उत्तर दिले की, श्रीगुरुमाय! स्वर्गसुख तर आपल्या सहवासात मी नित्य अनुभवित आहे. मला अतींद्रिय सुख पाहिजे. त्यावर गुरुदेव म्हणाले, श्री जनउपाधिचा नाद सोडून तू जो वेदांत श्रवण केला आहेस, त्याचा पुन्हा पुन्हा विचार कर. आत्मानात्म विचारात नित्य दंग राहा. तू कोठेही असला तरी माझ्या सान्निध्यात असल्यासारखेच समज. नर्मदा किनारी जाऊन अभ्यास कर. तेथेही जनउपाधी लागली तर अरण्यात जाऊन राहा. गुरुदेवांचे हे शब्द ऐकून त्यांनी गुरुदेवांना साष्टांग दंडवत घातला व प्रारब्धयोगे जनउपाधी लागली तर काय करावे अशी विनवणी केली. त्यावर गुरुदेव म्हणाले की प्रारब्धाने जे जे होईल ते होऊ द्यावे. तरच आत्मसुख लाभू शकते. गुरुदेवांचे हे शब्द ऐकून सद्गुरुंना नवीन दृष्टी मिळाल्याचे समाधान लाभले. पण गुरुदेवांपासून दूर व्हावे लागणार म्हणून दु:खही झाले. गुरुदेवांनी कृपादृष्टीने पाहून त्यांना आशिर्वाद दिला.

गुरुदेवांच्या आज्ञेनुसार सद्गुरु गांडा महाराज नर्मदा किनारी जाण्यासाठी निघाले. मार्गावरील या गावी त्यांनी त्या वर्षीचा चातुर्मास केला. त्यानंतर ते पळसाणा तालुक्यात असणाऱ्या साकी या गावी गेले. तेथे श्री कुंवरजी भुलाभाई यांच्या चारीधाम यात्रेच्या मावंद्याच्या कार्यक्रमात ते उपस्थित राहिले. कोणीही प्रसाद घेतल्याशिवाय जावू नये अशी घोषणा सद्गुरुंनी केली. स्वयंपाक केवळ हजार माणसांचा केला होता. प्रत्यक्षात तीन हजार माणसे उपस्थित होती. सद्गुरुंनी ही अडचण जाणून भोजनसामुग्रीवर एक मोठे वस्त्र टाकावयास लावून त्यावर पाणी अभिमंत्रित करून शिंपडले व तुपाचा दिवा लावून गुरुदेवांच्या नावाचा जयघोष केला. तीन हजार माणसे तृप्त होईपर्यंत जेवली.

या कार्यक्रमानंतर सद्गुरु टिंबरवा, डुंगरी, व्यारा या गावाहून, कमकुवा येथे श्री रघुजी यांच्याकडे गेले. पण तेथे ते आजारी पडल्याने श्री कल्याणजी यांनी त्यांना भडोच येथे आणले.

सद्गुरुंच्या वडीलांची प्रकृती दिवसेंदिवस क्षीण होत होती. त्यांना संन्यास दीक्षा द्यावी की देऊ नये याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सद्गुरु गरूडेश्वर येथे गेले व गुरुदेवांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी श्री.प.पू. डाह्याभाईंना संवत १९७० च्या कार्तिक शुक्ल द्वितीयेस आतुर संन्यास घ्यावयास लावला.

सद्गुरु गांडा महाराजांना अन्य कशाचाही मोह नसला. तरी गुरुदेवांच्या सहवासात राहण्याचा मोह होता. गुरुदेवांच्या भेटीसाठी त्यांचे मन नेहमी तळमळत असे. गुरुदेवांच्या आज्ञेनुसार त्यांचा मुक्काम भडोच येथे होता. पण मन मात्र गरुडेश्वराला गुरुदेवांच्या विचारात दंग झालेले असे. म्हणून ओढ अनावर होउन ते गरुडेश्वरला गेले व गुरुसेवेत रममाण झाले. गुरुसेवेत दिवस कसे जात होते ते कळत नव्हते. एक दिवस गुरुदेव श्री प.प.स.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज सद्गुरुंना म्हणाले, “गांडा तू भडोचला जा. तुझ्या वडीलांची प्रकृती अशक्त झालेली आहे. त्यांना सेवेची गरज आहे आणि त्यांची सेवा म्हणजेच माझी सेवा आहे. मातृदेवो भव पितृदेवोभव ही वेदाज्ञा आहे. तिचे पालन केलेच पाहिजे. वडील आणि गुरु यांचा अधिकार सारखाच आहे. त्यासाठी तू भडोच येथे जाऊन आधी वडीलांची सेवा कर.” गुरु आज्ञेनुसार सद्गुरु भडोच येथे आले. पण पुन्हा गुरुदेवांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे कळाल्याने ते पुन्हा गरुडेश्वला गेले. गुरुदेवांनी पुन्हा त्यांना सांगितले की, “तू वडिलांची सेवा सोडून पुन्हा आलास, तुझा मोह अजूनही दूर झालेला नाही. माझ्या सेवेसाठी येथे पुष्कळ शिष्य आहेत. तू माझी काळजी करू नकोस. वडीलांची काळजी कर.”

गुरुदेवांच्या सांगण्याचे मर्म सद्गूरूनां कळाले. त्यांची सोबत आता थोड्याच दिवसांची आहे, हे त्यांनी जाणले आणि गुरुमाऊलींना विनविले की, “आपल्या सहवासात ब्रह्मात्मता लाभली, पण गुरुतत्वाशिवाय आपली सेवा कशी पूर्ण होणार?” हे एकूण गुरुदेवांनी स्मित केले व शंकराचार्यांचा श्लोक म्हणून “गुरु व परमतत्व एकच आहे”, असा स्वरूपबोध सद्गुरुंना केला. सद्गुरुंनी गुरुदेवांना साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा गुरुदेवांनी त्यांच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला व आशिर्वाद दिला.

पुढे वैशाख महिन्यात गुरुदेवांची प्रकृती अधिक बिघडली. सद्गुरु गांडा महाराजांना भडोचहून बोलावण्यात आले. गुरुदेवांजवळ जी चांदीची दत्तमूर्ति होती ती वाडी, गाणगापूर अथवा एखाद्या सद्भक्ताकडे द्यावी अशी गुरुदेवांची इच्छा होती. पण दत्तप्रभुंना गरूडेश्वर येथेच राहून लीला करावयाची असल्याने त्यांनी सद्गुरु गांडा महाराजांना दृष्टांत देऊन येथे मंदिर बांधण्याची आज्ञा केली. त्यानुसार गुरुदेवांना माहित न होऊ देता वर्गणी देण्याविषयाचे एक विनंती पत्र स्वत:च्या हस्ताक्षरात तयार केले व स्वतःची सेवा म्हणून एक हजार रूपयांचा आकडाही टाकला व ते पत्र सर्वांना दाखविण्यास सांगितले. अवघ्या एका तासात आठ हजारांचा आकडा त्या पत्रकात भरला गेला.

गुरुदेवांच्या सेवेत रत असतांना गुरुदेवांनी पुन्हा सद्गुरु गांडा महाराजांना परत भडोच येथे जाण्याची आज्ञा केली. त्यानुसार निघण्यापूर्वी गुरुदेवांचा निरोप घेताना त्यांचे अंतकरण हेलावून गेले. पुढे शांत झाल्यावर त्यांनी गुरुदेवांसमोर प्रार्थना केली की, “हे माऊली……… या दासाची एवढीच विनंती ऐकावी की, प्रारब्धप्रतिबंध निर्माण झाला तर त्यावेळी माझा सांभाळ करावा. पुन्हा भूवर जन्म घ्यावा लागू नये. विदेह कैवल्यपद लाभावे. श्री गुरु स्वरूपाशी एक करावे.” सदगुरूंची ही प्रार्थना ऐकून गुरुदेव म्हणाले की, “श्री दत्तात्रेय तुझी इच्छा पूर्ण करतील. माझ्या सहवासात राहून तू जशी दत्तसेवा व माझी सेवा केलीस तशीच एकनिष्ठेने वडीलांची सेवा कर. त्यांचे मन यत्किंचितही दुखवू नकोस. त्यांच्या ऋणातून मुक्त हो, नंतर आराधना कर. सर्व मायिक संबंधांचा त्याग कर. संन्यस्त हो आणि दूर निघून जा. तुझ्या ह्रदयात मी आहे, हे व्रत सांभाळून राहा. गुरु शिष्यांचा जोवर भेद आहे तोवर मुक्ती मिळत नाही. यासाठी शरीरभाव त्यागून आत्मभावाने एक हो. हा माझा उपदेश सदैव ध्यानात ठेव.” एवढे बोलून गुरुदेवांनी सद्गुरुंना प्रसाद दिला. तो भक्षण करून सद्गुरुंनी गरूडेश्वर सोडले व ते भडोच येथे आले.

प.पू.श्री डाह्याभाईंची प्रकृती संवत् १९७५ च्या श्रावण शुक्ल नवमीच्या दिवशी अस्वस्थ झाली. सद्गुरु गांडा महाराजांनी त्यांना स्नान घालून पाटावर बसविले व परम तत्त्वावर लक्ष केंद्रित करण्याची सूचना केली. त्यानुसार प.पू.श्री.डाह्याभाईंनी “नारायण नारायण” असा उच्चार करता करताच प्राण सोडला. सद्गुरु गांडा महाराजांनी धर्मशास्त्रानुसार पुढील विधी पार पाडले व ते मातृ-पितृऋणातून मुक्त झाले.

गुरुदेवांची आज्ञा संन्यास मार्गाने जाण्याची असल्याने सद्गुरु गांडा महाराजांनी नौचौकी घाटावर शके १८४१ च्या माघ महिन्याच्या वद्य पक्षात संन्यास घेतला. श्री भालचंद्र शास्त्री शुक्ल यांनी प्राचाश्चित्तादि विधी करावयास लावले. त्यावेळी तेथे केशवानंद नावाचे स्वामी आले. त्यांनी प्रेषोच्चार करवून घेतला. विधिवत् कटिसूत्र, कौपीन व काषाय वस्त्रेही दिली. पुढे नामाभिधान व दंड मिळविण्याविषयी तळमळ सद्गुरुंना लागली. अशा अवस्थेतच गुरुदेवांनी, “तुझे दंडगुरु श्री कृष्णानंद सरस्वती आहेत”, असा दृष्टांत दिला. गुरुआज्ञेनुसार सद्गुरु त्यांच्या शोधासाठी निघाले. डाकोर येथे गोमती नदीच्या तीरावर प.पू.श्री कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराजांची भेट झाली. त्यांनी सद्गुरुंना दंड दिला व योगानंद सरस्वती हे नामाभिधान ठेवले.

दंड धारण केल्यानंतर सद्गुरु योगानंद स्वामी महाराजांनी पहिला चातुर्मास भडोच येथे केला (शके १८४१). त्यांचा शके १८४२ चा दुसरा चातुर्मास नाशिक येथे झाला. तिसरा चातुर्मास श्रीक्षेत्र अनावल श्री शुक्लेश्वर महादेव मंदिर (जे अनावील ब्राह्मणांचे कुलदैवत आहे) येथे संपन्न झाला. येथे सद्गुरुंनी योगसुत्रांवर एक पुस्तक लिहिले पण ते सध्या उपलब्ध नाही. त्यानंतर सद्गुरु गुरुदेवांच्या आज्ञेनुसार नर्मदातट सोडून ब्यादा, नंदूरबार या गावांहून औरंगाबादला आले. तेथे चौराहा येथे असणाऱ्या राम मंदिरात त्यांनी काही दिवस मुक्काम केला, तेथे त्यांना सेलू येथील श्री विष्णुपंत पंची आणि श्री पंडितराव चौधरी येऊन भेटले व श्री विष्णुपंत पंची यांनी त्यांना सेलू येथे येण्याची विनंती केली. त्यामुळे सद्गुरु योगानंद सरस्वती स्वामी महाराज सेलू येथे या भक्तांसोबत आले. तेथे मुरलीधराच्या मंदिरात त्यांचा मुक्काम घडला. प.पू.श्री.प.प.स.योगानंद सरस्वती स्वामी महाराज सेलूला आले आहेत, ही वार्ता आसपासच्या गावांमध्ये पसरली व गांवोगावीचे भक्त महाराजांच्या दर्शनासाठी येऊ लागले. पंचपदी आणि नित्यकर्मेही मोठ्या उत्साहात पार पडू लागली. भक्तांसोबत धार्मिक चर्चाही होऊ लागली. सद्गुरुंचा सहवास आपल्याला मिळावा, त्यांची अमृतवाणी श्रवण करता यावी, दत्तप्रभुंच्या नामस्मरणात तल्लीन होऊन स्वतःस विसरण्याचे भाग्य लाभावे अशी इच्छा ठीकठिकाणांहून आलेल्या भक्तांच्या मनात उत्पन्न झाली. त्यातून सद्गुरुंनी आपल्या गावी यावे असा आग्रह भक्त मंडळी करू लागली.

जिंतूर जवळ असणाऱ्या नृसिंहाचे वरूड या गावी यज्ञ संपन्न होणार होता. त्यासाठी तेथील भक्तांनी श्री योगानंद सरस्वती स्वामी महाराजांना येण्याची विनंती केली. त्यामुळे महाराज वरूडला यज्ञासाठी उपस्थित राहिले. यज्ञाचा महाप्रसाद आणि सद्गुरुंचे दर्शन अशी पर्वणी भक्तांना एकाच वेळी लाभल्याने वरूडला भक्तांची रीघ लागली. सावळी येथून श्रीमती अहिल्याबाई जोशी गावातील इतर भक्तमंडळींसोबत वरूडला आल्या. त्यांनी मनोभावे सद्गुरुंचे दर्शन घेतले. सद्गुरुंनी प्रसाद म्हणून त्यांना पंचपदीचे पुस्तक दिले. त्यांनी ते सांभाळून ठेवले. सद्गुरु योगानंद महाराजांची दृष्टी दिव्य होती. पंदपदीचा खरा भक्त याच माऊलीचा पुत्र असून सावळी येथे ‘चिंतामणी’ च्या रूपात वाढत आहे, हे त्यांनी जाणले होते.

वरूड येथील कार्यक्रमानंतर सद्गुरु परत जिंतूरला आले. तेथून सातोना, आष्टी, गोळेगांव, धामणगांव या गावी सद्गुरुंचे काही काळ वास्तव्य घडले. तेथून ते मानवतला आले. श्री श्यामराव चौधरी यांनी विनंती करून त्यांना पाथरी येथे नेले. त्यावेळी वैशाख मास सरत आला होता. दशहरापर्व सुरू होणार होते. म्हणून सद्गुरुंनी गंगेच्या स्थानी वास्तव्य करण्याची इच्छा प्रकट केली. त्यानुसार पाथरीपासून जवळ असलेल्या गुंज या गावी भक्तांनी सद्गुरुंना नेले. शके १९४४ मध्ये वैशाखमासाच्या शुक्ल पक्षात सद्गुरु योगानंद महाराज पाथरीकर चौधरी मंडळीसह गुंज येथे आले. तेथे श्री सिध्देश्वर महादेव मंदिरात त्यांच्या थांबण्याची व्यवस्था करण्यात आली.

सद्गुरु श्री प.प.स. योगानंद सरस्वती स्वामी महाराजांचे पाय या स्थानास लागताच त्याचा पांग फिटला. ती जागा स्वच्छ करण्यात आली. सद्गुरुंचे दर्शन घेण्याकरता दररोज अनेक गावांहून लोक येऊ लागले. सावलीसाठी मंडप टाकण्यात आला. अन्नदान होऊ लागले. भजन, किर्तन, पंचपदीच्या गजराने गोदामातेचा पवित्र तीर दुमदुमूनि जाऊ लागला. सारे वातावरण भक्तिमय होऊन गेले. शके १९४४ चा दशहरा व चातुर्मास सद्गुरुंनी गुंज येथेच केला. चातुर्मासानंतर सद्गुरु पाथरी व रेणापूरला गेले व तेथून श्री बाबा कल्हे यांच्या विनंतीनुसार ते मानवतला आले. मानवत येथे श्रीदत्त मंदिर नव्हते. तेथे दत्त मंदिर व दत्त पादुका असाव्यात अशी भक्तांची इच्छा होती. त्यानुसार श्री बाबा कल्हे यांनी पुढाकार घेतला. व श्रीमत् प.प.स.योगानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या सान्निध्यात शके १८४४ मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशीस श्रीदत्तप्रभुंच्या मूर्तिची व पादुकांची प्रतिष्ठापना मानवत येथील राममंदिरात करण्यात आली. सुरुवातीची अकरा आवर्तने होईपर्यंत सद्गुरुंनी कमंडलुतील पाण्याने स्वतः श्रीदत्तप्रभुंच्या मूर्तिस अभिषेक केला. मानवतला सद्गुरुंचे वास्तव्य असतांना तेथे पाण्याची तीव्र टंचाई होती. श्रीरंगनाथ जोशी यांच्याकडे आड होता. पण त्यात पाणी नव्हते. सद्गुरुंना हे कळाले तेव्हा त्यांच्या कमंडलुतील पाणी त्या आडात टाकले आणि त्या आडास पुरेपुर पाणी आले.

मानवतहून सद्गुरु जिंतूर येथील येथे आले. तेथे श्रीदत्त मंदिरात त्यांनी मुक्काम केला. हे दत्तमंदिर पावसाळ्यात गळत असल्यामुळे खराब झाले होते. त्यामुळे सद्गुरुंनी नाराजी व्यक्त केली व भक्तमंडळीच्या हाताने या मंदिराचा जीर्णोद्धार करून घेतला.

सद्गुरुंचा मुक्काम जिंतूरला होता. त्यावेळी प.पू.श्री. चिंतामणी महाराज ७-८ वर्षांचे होते व जिंतूर येथे श्री शंकरशास्त्री पुराणिकांचे घरी शिकण्यासाठी राहात असत. तेही नित्यनियमाने पंचपदीला येत. तेव्हा सद्गुरु त्यांना “तुझा अभ्यास कसा काय चालू आहे” असे विचारीत. ‘ठीक चालू आहे’ एवढेच बोलून प.पू.श्री.चिंतामणी महाराज पंचपदीत तल्लीन होऊन जात. उभयतांमधील या संवादाचे इतरांना काही वाटत नसे. आता त्यात किती गूढार्थ भरलेला होता याची प्रचिती येते.

शके १८४५ चा दशहरा गोपेगांव येथे झाला तर चातुर्मास गुंज येथे झाला. याच काळात श्री गुरुमूर्तिचरित्र या ग्रंथाच्या लिखाणास प्रारंभ झाला. सिद्धेश्वराच्या देवालयात बसून सद्गुरु सांगत व गुंज येथील श्री कृष्णाबुवा रामदासी लिहून घेत. श्रीगुरुमूर्तिचरित्राचे पंधरा अध्याय या काळात लिहून पूर्ण झाले.

शके १८४६ चा दशहरा सद्गुरुंनी दाजीमहाराजांच्या टाकळीस केला व तेथून ते श्री प.प.स.योगानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीसाठी मानवतला गेले. तेथे पाऊस नव्हता व पाण्याची खूप टंचाई होती. मानवतकर अक्षरश: हैराण झाले होते. सद्गुरुंनी परमतत्त्वाची आराधना केली व तीन दिवस मानवतला पाऊस पडला. सद्गुरुंनी शके १८४६ चा चातुर्मास गुंज येथेच केला. शके १८४७ चा दशहरा मोरेगांव येथे तर चातुर्मास कानडखेड येथे संपन्न झाला. याच वास्तव्यात श्री गुरुमूर्तिचरित्राच्या लेखनास पुन्हा सुरूवात झाली. श्री हनुमंतराव वाकडीकर हे लिखानाचे कार्य करीत होते. शके १८४८ चा दशहरा जोडसावंगी येथे १८४९ व १८५० या संवत्सरातील दशहरापर्व सद्गुरुंनी मोरेगांव येथेच साजरे केले. तर या दोन्ही संवत्सरातील चातुर्मास वाकडी येथे झाले. वाकडी येथील या चातुर्मासांच्या काळात श्री गुरुमूर्तिचरित्राचे लेखन पूर्ण झाले. सद्गुरु श्री प.प.स.योगानंद सरस्वती स्वामी महाराज सांगत व वाकडी येथील श्री हनुमंतराव देशपांडे हे उतरून घेत तर श्री बापूराव मोरेगांवकर ग्रंथ लिखानासाठी दररोज ताजी शाई तयार करून वाकडीस पाठवित. अशा पद्धतीने १४,८८३ ओव्यांचा व १३५ अध्यायांचा हा भव्यदिव्य ग्रंथ सर्वांच्या कल्याणासाठी सद्गुरुंनी मराठीत तयार केला. ग्रंथ तर तयार झाला पण आता त्यांच्या शुद्धिकरणाची तळमळ सद्गुरुंना लागून राहिली. इकडे नारेश्वर येथे श्रीरंगअवधूत महाराजांना गुरुदेव श्री प.प.स.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा दृष्टांत झाला की, “ब्रह्मचारी, गांडा तुझी वाट पहात आहे.” त्यानुसार श्रीरंगावधूत महाराज वाकडी येथे आले. त्यांनी शुध्दीकरणाचे कार्य पूर्ण केले व नर्मदेस परिक्रमा केल्यानंतर त्यांनी भडोच येथे सहा महिने मुक्काम केला व ग्रंथाची मुद्रिते स्वत: तपासून त्याचे पारायणही स्वत: केले. या कार्यास प.प.श्री.योगानंद महाराजांचे पुर्वाश्रमातील मेहुणे श्री कल्याणजी भाई यांनी खूप मदत केली.

शके १८५० च्या वाकडी येथील चातुर्मासानंतर सद्गुरुंचे वास्तव्य गुंज येथे होते. माघ शु.१८ शके, १८५० चा दिवस होता. त्या दिवशी प.पू.श्री चिंतामणी महाराज सद्गुरुंच्या  दर्शनाला आले. त्यांनी श्री प.प.स.योगानंद महाराजांचे दर्शन घेतले आणि धीरपणे प्रश्न विचारले की, मी सातवीची परीक्षा पास होईल का? मला वकील व्हायचे आहे! त्यावेळी सद्गुरुंनी क्षणभर स्मित केले व भस्माची चिमुट त्यांना देऊन सांगितले की, ‘हे जपून ठेव’ सद्गुरुंनी दिलेले भस्म क्षणाचाही विचार न करता त्यांनी खाऊन टाकले. सद्गुरुंनी त्यांना आपल्या कमंडलूतले तीर्थही दिले. तेही त्यांनी चटकन पिऊन टाकले. ओला हात सर्वांगाला पुसला. सद्गुरुंनी आपली दिव्य दृष्टी प.प.श्री चिंतामणी महाराजांवर फिरवली व ते म्हणाले की ‘जा तू देवाच्या दरबाराचा वकील होशील’ अशा प्रकारे श्रीमत् प.प.स.योगानंद सरस्वती स्वामी महाराजांनी आपला अध्यात्मवारसा परमपूज्य समर्थ सद्गुरु चिंतामणी महाराजांना जणू सोपवून दिला.

(पहा हा कसा उपलक्षणात्मक संवाद होता. मी सातवीची परीक्षा पास होईल का…… या विधानाचा अर्थ लौकिक अर्थाने शालेय अभ्यासक्रमातील इयत्ता सातवीची परीक्षा पास होईल का असा होतो. परन्तु आध्यात्मिक जगतात सातवी म्हणजे कुंडलिनीच्या सातव्या चक्राच्या भेदनाची क्रिया. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धि आणि आज्ञा ही सहा चक्रे पार करून शेवटचे जे सहस्रार चक्र, त्याचे भेदन केले म्हणजे जीवशिवैक्य होते. कैवल्य प्राप्त होते. अद्वैत निर्माण होते. समर्थ सद्गुरु श्री चिंतामणी महाराजांनी याच चक्राच्या भेदनाविषयी प्रश्न केलेला असेल असे वाटते. शिवाय वकीली म्हणजे जनसामान्यांच्या ह्रदयात असणाऱ्या अज्ञान-शङ्का दूर करण्यासाठी देवाच्या अस्तित्वाचा आणि त्याच्या कृपेच्या प्राप्तिचा जो पक्ष, त्या पक्षाची वकिली करून भक्तिची ज्योत जनजनाच्या ह्रदयात तेवविण्याचे कार्य असे हे वकीली करण्याचे तात्पर्य आहे, असे वाटते. )

पुढे सद्गुरु योगानंद महाराजांची प्रकृती अस्वस्थ झाली. गुजरातमध्ये ही वार्ता पसरली. सद्गुरुंचे पुर्वाश्रमातील कनिष्ठ बंधू श्री रघुजीभाई, श्री प्रभाशंकर ब्रह्मचारी, प.पू.श्री रंगवधूत महाराज सद्गुरुंच्या सेवेसाठी गुंजेस आले. एक दिवस सद्गुरुंनी भक्तांना बोलावले व सर्वांना आपले मनोगत सांगितले की, “श्रीदत्त संप्रदायाचे कार्य, धर्मजागृती व अन्नदान या गोष्टी गुंज येथे अव्याहतपणे चालू राहाव्यात. या दृष्टिने येथे दत्त मंदिर बांधून संस्थानच्या दृष्टीने आखणी व्हावी. दत्त प्रभुंची कृपा व गुरुदेवांचे आशिर्वाद पाठीशी राहतीलच. कोणतीही शंका मनात आणू नये. एकदा कामाला लागलात म्हणजे कशाचीही कमतरता पडणार नाही. देवांचे नित्यपूजन, करुणात्रिपदी, पालखी, शंकराची अव्याहतपणे बिल्वपत्रांनी पूजा व अभिेषेक यात खंड पडू देऊ नये. पंच नेमून कमिटीद्वारा सर्व हिशेब व्यवस्थित ठेवावा. होणारी मालमत्ता संस्थानच्या नावावर करावी.” एवढे सांगून सद्गुरुंनी संन्यासाश्रमात अंत्यविधी कसा करावा लागतो याची कल्पना भक्तांना दिली.

पुढे सद्गुरुंच्या अंगावरची सूज खूप वाढली. शरीराला पडून राहणेही कष्टदायक वाटू लागले. प.पू.श्री रंगावधूत महाराजांनी एका पोत्यात साळीचा भुसा भरून मऊ मऊ गादीसारखा बिछाना तयार केला ते रात्रंदिवस सद्गुरुंच्या सेवेत राहू लागले. पण त्यांचा भाऊ मुंबई येथे आजारी असल्याचा दृष्टांत झाल्याने प.पू. श्री.रंगावधूत महाराज मुंबईकडे रवाना झाले.

अवतार त्यागाचा समय आलेला जाणून श्री प.प.स.योगानंद सरस्वती स्वामी महाराजांनी शके १८५० च्या फाल्गुन वद्य द्वादशीस पहाटे ४ वाजता पद्मासन घालून बैठक स्थित केली. प्राणायाम केला. ध्यान लावले. गुरुदेवांचे दर्शन घडल्यानंतर श्रीदत्तप्रभू दिसू लागले आणि त्यांनी प्रणवउच्चार करून भौतिक देहास सोडून ते स्वस्वरूपात विलीन झाले.

तलंगपुरच्या नीळकण्ठेश्वराच्या सान्निध्यात उमललेले हे जीवनपुष्प, श्री प.प.स.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या सहवासात बहरले, धर्मजागृतीच्या कार्यासाठी सिद्ध झाले आणि मनामनात धर्मजागृतीचे व दत्तभक्तीचे स्फुल्लिंग चेतवून गुंज येथील श्री सिद्धेश्वराच्या सान्निध्यात गोदामातेच्या कुशीत स्वस्वरूपात विलीन झाले.

मुखी दत्तनामस्मरण। चित्ती असावे हेचि ध्यान।

अंती पावावे निर्वाण। सच्चिद्घन नमू भावे॥

प.प.श्री.रंगावधूत महाराजाच्या वरील शब्दाद्वारे श्री प.प.स. योगानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया.

॥श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु योगानंद सरस्वती स्वामी महाराज की जय॥

Contact us
If you are interested or have any questions, send us a message.
I am very interested
Send Message