लोकोत्तर महापुरुषांची व्यक्त जीवने ही अपार समुद्रामध्ये तरंगणाऱ्या प्रचंड हिमनगाच्या टोकासारखी भासतात. ते टोक जेवढे पाण्याच्या वर दिसत असते, त्याच्या सहस्रावधीने अधिक विशाल असा त्याचा अव्यक्त, अदृष्य भाग, समुद्राच्या अंतरंगात खोलपर्यंत गेलेला असतो. त्यामुळे “संत सत्पुरुषाने अमुक प्रकारे वर्तन केले, त्यांचा अमुक असा स्वभाव होता, त्यांच्या अमुक अशा आवडी-नावडी होत्या, ते अमुक प्रकारच्या भाषेचा वापर करायचे ” अशा निकषांमध्ये जो कुणी त्यांचे मूल्यमापन करू जातो, तो अतिशय उथळ अशा पापुद्र्यावर अडकून राहतो.
मानवाचे सर्वश्रेष्ठ इंद्रिय म्हणजे त्याची बुद्धि. त्या बुद्धिच्या कवेत सद्गुरुतत्त्व आणि त्याचा अगाध महिमा हे कधीच येणे शक्य नाही, परन्तु उत्तमामध्ये उत्तम असे बुद्धिसारखे दुसरे साधन देखील नाही. बुद्धिमध्येही तिच्या कार्यानुसार कैक प्रकार करता येतील. त्यापैकी जी अज्ञाताला आणि अनंताला आपला विषय करते ती “श्रद्धा” ही बुद्धितत्त्वामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. अशा सश्रद्ध बुद्धिने सद्गुरुंचे शोधन करू गेल्यास सद्गुरु हे “श्रोत्रिय”, “ब्रह्मनिष्ठ” आणि “भ्रान्त्यादि चतुर्दोषरहित” असतात अशी गुरुतत्त्वाची लक्षणे श्रुति सांगते.
आपण तरले नव्हे ते नवल।
कुळे उद्धरील सर्वांची तो।
तोचि ज्ञानी खरा तारी दुजियासि।
वेळोवेळा त्यासि शरण जावे।।
असे संतश्रेष्ठ तुकोबाराय सांगतात. सद्गुरुंचा हाडामांसाचा देह आणि त्याने केलेल्या लीला ह्या त्यांच्या अस्तित्त्वाचा अत्यंत लघु अंशमात्र होय. शिवाय “संत दिसती वेगळाले। परि ते अंतरी मिळाले॥” ह्या वचनानुसार संतमहात्म्ये विविध प्रांतांमध्ये जन्म घेऊन, नाना प्रकारचे वेश धारण करतात, नाना स्वभाव प्रकट करतात, अत्यंत विलक्षण असे मार्ग चोखाळतात आणि मार्ग दाखवितात, परन्तु त्या सर्वांमध्ये अणुमात्र फरक नसतो. त्यांचे अंतरंग हे सर्वगत, सर्वसमर्थ, सर्वज्ञ, एकरस परब्रह्मस्वरूपंच असते.
श्री योगानंद महाराज संस्थान, श्रीक्षेत्र गुंज अत्यंत जाज्वल्य आणि जागृत दत्तसंस्थान आहे. स्वयं परब्रह्मविग्रह भगवान श्री दत्तात्रेय महाराज हे ज्याचे मूळ आहे, श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हे ज्याचा बळकट बुंधा आहे, त्या अत्यंत विशाल अशा दत्तसंप्रदायाच्या महावृक्षाची प्रमुख शाखा श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु योगानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या रूपे अवतरित झाली आणि श्रीक्षेत्र गुंज येथे ही शाखा पल्लवित होऊन तिला श्री दत्तसंस्थानरूपी मधुर फळ लागले. ह्या शाखेमध्ये आधी समर्थ सद्गुरु श्री चिंतामणी महाराजांनी आपले सर्वस्व, आपला आत्मा ओतून भक्ति, ज्ञान, वैराग्य आणि पावित्र्यरूपी पुष्पे विकसित केली, संस्थानाची स्थापना केली. पुढे आपल्या सद्गुरुंच्या एका आज्ञेनिशी सर्वस्वाचा त्याग करून, संसारपाश छिन्न करून सद्गुरु श्री छनुभाई महाराजांनी ह्याच संस्थानाचा, त्याच्या कार्याचा अनंतपट विस्तार केला. श्री दत्तमहाराजांपासून निघालेली ही गुरुगंगा जशी उगमापाशी तशीच संस्थानरूपी विस्तीर्ण पात्राशी एकरस परब्रह्मस्वरूप आहे, विशुद्ध, निर्मल आहे.
उज्ज्वल श्री गुरुपरंपरेमध्ये सद्गुरु श्री छनुभाई महाराजांचे जीवन हे तत्तुल्य देदिप्यमान आणि शांतरसाने ओतप्रोत भरलेले आहे.
जन्म व लौकिक शिक्षण
पुण्यपावन श्री योगानंद महाराजांच्या पवित्र देसाई वंशामध्ये त्यांचेच सख्खे बन्धु श्री रघुनाथजी देसाई ह्यांच्या पोटी शके १८५१ (शुक्ल नाम संवत्सर), मासोत्तम वैशाखातील शुद्ध एकादशी, शनिवार (दि. १८/०५/१९२९) रोजी रात्रौ १०:४५ वा. गुजरातमधील सोनगढ येथे श्री छनुभाई महाराजांनी देह धारण केला. श्री योगानंद महाराजांनी हाती घेतलेले, श्री चिंतामणी महाराजांनी वृद्धिंगत केलेले कार्य पुढे चालविण्यासाठी, त्याला अनंतपट वाढविण्यासाठी श्री छनुदेव ह्या धरणीवर अवतरित झाले. ह्यांचा जन्म होण्याच्या आधी शके १८५० चे फाल्गुन मासामध्ये श्री योगानंद महाराजांनी महासमाधि घेतली होती. तीच ज्ञान-भक्तिची ज्योत अखंड तेवत राहावी ह्यासाठीच की काय जणु अवघ्या दोन महिन्यांच्या अंतरावर श्री छनुमहाराजांनी जन्म घेतला.
महाराजांच्या जन्मानंतर एका वर्षाने त्यांना मातृवियोग झाला. तेव्हा घरी नित्य गृहकर्मे, स्वयंपाक इ. करण्यासाठी कुणी बाईमाणुस नसल्यामुळे त्यानंतरची दोन वर्षे त्यांचा सांभाळ त्यांच्या मावशीकडूनंच झाला. पुढच्या काळात त्यांना पालनपोषणासाठी मामांच्याकडे देण्यात आले. ह्या काळात श्री महाराजांच्या घरी त्यांचे पिताश्री श्री रघुनाथजी आणि वडील बंधु श्री नाथुभाई हे दोघेच होते. श्री नाथुभाई वयाने मोठे होते व तेच शिक्षण सांभाळून घरी स्वयंपाकादि कर्मे करीत असत. पुढे त्यांनी वडिलांच्या पेढीच्या व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केली. ह्याच दरम्यान शके १८६२ (१९४०) साली श्री नाथुभाईंचा विवाह करण्यात आला.
इकडे छोट्या श्री छनुभाईंचे मामाकडे राहून शिक्षण चालू होते. इ.स. १९४६ सालात त्यांनी त्याकाळचे चौथीपर्यंतचे शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यानंतर मात्र शिक्षण सोडले. त्याकाळी अधिक शिक्षण घेण्याचा प्रघात नव्हता आणि इंग्रजांविरुद्धचा भारताचा स्वातंत्र्यलढा देखील त्याच्या परमोच्च सक्रीय अवस्थेत होता. त्याचा प्रभाव सुद्धा जनतेच्या सामान्य परिस्थितीवर होताच. त्यामुळेही असेल की, श्री महाराजांनी पुढील लौकिक शिक्षण घेतले नाही.
व्यवसाय
शिक्षण पूर्ण झाल्यावर छोट्याशा छनुभाईंनी आपल्या ज्येष्ठ बंधुंसोबत घरच्या पेढीवर राहून दुकान सांभाळण्यास सुरुवात केली. एकाला दोघे झाल्यामुळे व्यापारात नफा होण्यास सुरुवात झाली आणि धंद्यात उत्तम जम बसला. भाऊ सोबतीला असल्यामुळे आणि आताशा तो पेढीचे व्यवहार उत्तम रीतिने हाताळत असल्यामुळे श्री नाथुभाईंनी सरकारी रोड कॉन्ट्रॅक्ट घेण्यास सुरुवात केली. त्यातही विलक्षण लाभ झाल्याने श्री नाथुभाईंनी “एन. आर. देसाई अँड कंपनी” नावाची कंपनी सुरु केली. त्यातंच सोनगढ येथे नवा पेट्रोल पंप सुरु केला. ज्याला हात घालावा ते काम उत्तम प्रकारे वृद्धिंगत होत होते. नवीन सुरु केलेल्या पेट्रोल पंपाद्वारे शासकीय गाड्यांना इंधन पुरवठा करण्याचे कॉन्ट्रॅक्ट देखील कंपनीला मिळाले व आर्थिक स्थिती आणखीच भक्कम झाली.
सर्व काही उत्तम चालले असताना ह्याच दरम्यान शके १८६९ (इ.स.१९४७) मध्ये श्री नाथुभाईंच्या पत्नीने देह ठेवला. त्यांच्या पोटी गिरीशभाई नावाचा एक मुलगा होता. पुढे श्री नाथुभाईंनी सविताबेन ह्यांच्याशी पुन्हा विवाह केला. त्यांच्यापासून त्यांना रक्षा बहन नावाची मुलगी आणि प्रकाशभाई नावाचा मुलगा झाला.
विवाह आणि प्रपंचभार
वयाच्या २१ व्या वर्षी म्हणजेच शके १८७२ (इ.स. १९५०) साली श्री छनुभाईंचा देखील मरोली गावचे श्री रघुनाथजी मोहनभाई ह्यांची कन्या चि.सौ.का. मंजुला ह्यांच्याशी मोठ्या थाटामाटास विवाह करण्यात आला.सुयोग्य सहधर्मचारिणी मिळाल्यामुळे संसाराचा रथ अगदी उत्तम प्रकारे चालत होता. आर्थिक सुबत्ता असल्यामुळे प्रपंच शांततेत सुरु होता. संसाराच्या वेलीवर पहिले पुष्प उमलले. श. १८७४(इ.स.१९५२) साली प्रथम पुत्ररत्न राजेशभाई जन्मले. पुढे श. १८७९(इ.स.१९५७) व श. १८८२(इ.स.१९६०) ह्या वर्षांमध्ये अनुक्रमे आणखी दोन पुत्र भक्तेश व गुंजेश ह्यांचा जन्म झाला.
दरम्यानच्या काळात श. १८८७ साली श्री रघुनाथजी ह्यांचे देहावसान झाले. त्यांच्या पश्चात श्री योगानंद महाराज संस्थान श्रीक्षेत्र गुंज येथे त्यांचे ज्येष्ठ पुत्र श्री नाथुभाई ह्यांची ट्रस्टी म्हणून नेमणूक झाली. अशातंच पार्टनरने धोका दिल्यामुळे कंपनी व दुकान बंद करावे लागले. श्री नाथुभाई आणि श्री छनुभाई आता वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागले. उकाई येथे श्री छनुभाईंनी पुन्हा व्यवसाय सुरु केला.
मग घ्यावे परमार्थ विवेका।
श. १८८० हे श्रीमत् प.प.स. योगानंद सरस्वती स्वामी महाराजांचे जन्मशताब्दी वर्ष होते. ह्या वर्षी मार्गशीर्ष शु.९ ते १५ (दि. २८/११/१९६८ ते दि. ०४/१२/१९६८) ह्या सात दिवसांत श्रीक्षेत्र गुंज येथे जन्मशताब्दी सप्ताह उत्सवाचे आयोजन केले गेले. ह्या उत्सवाचे अध्यक्ष होते श्री नाथुभाई देसाई. उत्सवात सहभागी होण्यासाठी श्री छनुभाई व त्यांच्या पत्नी सौ. मंजुला ह्या सुद्धा आल्या होत्या. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष शु. १५ रोजी उभय दांपत्याने समर्थ सद्गुरु श्री चिंतामणी महाराजांचा अनुग्रह प्राप्त केला.
ह्या कार्यक्रमाचे निमंत्रण प.पू. श्री रंगावधूत महाराजांना देखील देण्यात आले होते. त्या वेळी ते म्हणाले होते की, “श्री योगानंद महाराज माझे ज्येष्ठ बंधु आहेत. त्यांच्या कार्यक्रमासाठी मला निमंत्रण देण्याची काय आवश्यकता?” पुढे पूर्वीच ठरलेल्या कार्यक्रमांतर्गत श्री रंगावधूत महाराज श्रीक्षेत्र हरिद्वार येथे गेले. तेथे दि. १९/११/१९६८, म्हणजेच श्री योगानंद महाराजांच्या जन्मशताब्दि सप्ताहाच्या १६-१७ दिवस आधीच हरिद्वारमध्ये परमपूज्य श्री रंगावधूत महाराजांनी समाधि घेतली. त्या दिवशी स.स.श्री चिंतामणी महाराज गुंजला बोलता बोलता म्हणाले की, श्री रंगावधूत महाराजांचे जन्मशताब्दीच्या कार्यक्रमास येणे होणार नाही. त्यांनी अंतर्ज्ञानाने ही घटना जाणून घेतली होती. पुढे यथावकाश सर्वांना ही दुःखद वार्ता समजली. जन्मशताब्दी कार्यक्रमामध्ये श्रीक्षेत्र गुंज येथे शेवटच्या दिवशी श्री दत्तजन्माच्या वेळी श्री नाथुभाईंची पत्नी सौ. सविताबेन ह्या श्री रंगावधूत महाराजांच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या असताना त्यांना गुंज येथील श्री दत्तमूर्तीमध्ये श्री रंगावधूत महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. जणु ते म्हणत होते की, मी कुठेही गेलो नाही. मी येथे गुंजला श्री दत्तस्वरूप होऊन वास करित आहे.
पत्नीवरील संकट व गुरुकृपेचा अनुभव
पुढे संसार सुरळीत चालू असताना अचानकंच श्री छनुभाईंच्या पत्नी सौ. मंजुला बेन ह्यांना रक्तदाबाचा त्रास होण्यास सुरुवात झाली. काही केल्या तो त्रास कमी होत नव्हता. शेवटी सुरत येथील एका हॉस्पिटलमध्ये त्यांना मुत्रपिंडाचा (किडनी) विकार झाला असल्याचे निष्पन्न झाले. प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यथाशक्य लवकर करून घेण्याचे डॉक्टरांचे म्हणणे पडले. पण इकडे सौ. मंजुलाबेन ह्यांनी जणु ठरविलेच होते आणि त्या पुन्हा पुन्हा हेच म्हणत होत्या की, “शस्त्रक्रियेआधी मला समर्थ सद्गुरु श्री चिंतामणी महाराजांचे दर्शन करावयाचे आहे.” आणि त्यांची प्रकृती तर अशी होती की त्यांना साधे उठून सुद्धा बसता येत नव्हते. मग एवढ्या लांबचा (किमान १२ ते १४ तासांचा) प्रवास करणे तर कसे शक्य होणार अशी चिंता सर्वांना लागली. श्री छनुभाई आणि सौ. मंजुलाबेन ह्यांची श्री चिंतामणी महाराजांवर नितांत श्रद्धा होती. श्रीमत् प.प.स. योगानंद महाराजांची पुण्यतिथी सुद्धा जवळ आली होतीच. तेव्हा तो मुहूर्त साधून श्री छनुभाई, सौ. मंजुला बेन, श्री नाथुभाई व सौ. सविताबेन हा संपूर्ण परिवार पुण्यतिथीच्या उत्सवासाठी हर कष्ट सोसून आला. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी पालखी निशानघाटावर नेण्यात आलेली होती. आधीची संपूर्ण रात्र श्री नाथुभाई आणि श्री छनुभाई पालखीसोबतंच होते. निशानघाटावर पालखी आली. तेथे श्री चिंतामणी महाराजांच्या हातून प्रसादाचे नारळ घेण्यासाठी सौ. सविताबेन आल्या. सौ. मंजुलाबेन ह्यांना नीट उठूनही बसता येत नसल्याने त्यांना तेथे नेले नाही. तेव्हा स.स. श्री चिंतामणी महाराजांनी त्यांच्याबद्दल विचारले. सौ. सविताबेन सांगतंच होत्या तेवढ्यात मागून सौ. मंजुलाबेन ह्यांचा आवाज आला की, “मी आले महाराज!”. सर्वांना सुखद आश्चर्याचा धक्का बसला. ज्या देवीला झोपाळा करून मंदिरात आणले होते, तीच आज स्वतः चालत आली आहे निशानघाटावर. हे आहे श्री सद्गुरुंवरील श्रद्धेचे आणि श्री सद्गुरुंच्या कृपेचे अमोघ फळ.
समर्थ सद्गुरु श्री चिंतामणी महाराजांनी मग सौ. मंजुलाबेन ह्यांनाही नारळाचा प्रसाद दिला आणि म्हणाले की, तुमची तब्येत मी चांगली करून देतो. श्री गोदावरी गंगेचे पाणी घड्याने आणून मला आंघोळ घालू शकाल असे करून देतो. परन्तु त्यासाठी तुम्हाला येथे काही दिवस येथे राहावे लागेल. परन्तु सौ. मंजुलाबेन म्हणाल्या की, “तुम्ही अंतर्यामी आहात. तुम्हाला सारंच ठाऊक आहे. मी येथे राहू शकत नाही. तुमच्या दर्शनाची जी इच्छा होती, ती तुम्ही पूर्ण केलीत. आता माझे ऑपरेशन होवो अथवा राहो, मला आता काहीही काळजी वाटत नाही.” त्यानंतर एक दिवस तेथे राहून सौ. मंजुलाबेन आणि श्री छनुभाई तेथून गुजरातला परतले.
पत्नीवियोग, बन्धुवियोग, सद्गुरुवियोग
गुजरातला आल्यानंतर श.१९०० (इ.स.१९७८) साली ज्येष्ठ पुत्र श्री राजेशभाई ह्यांचा विवाह चि.सौ.का. धर्मिष्ठाबेन ह्यांच्याशी झाला. श्री राजेशभाई बलसार येथे एका कंपनीमध्ये काम करत. त्यांचा संसार तेथे सुखाने सुरु झाला. दरम्यानच्या काळात सौ. मंजुलाबेन ह्यांना मुंबईला नेऊन तेथे डायलिसिस करून आणावे लागले. मुत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्याचे ठरले होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना किडनी देण्याचे सुद्धा ठरविले होते. पण डॉक्टरांनी सल्ला दिला की, त्यांची तब्येत हे ऑपरेशन पेलू शकणार नाही. तेव्हा ते रद्द करण्यात आहे. पुढे त्यांची तब्येतही दिवसेंदिवस बिघडत चालली होती. शेवटी श.१९०१(२१ जानेवारी १९७९ रोजी) त्यांचे प्राण सद्गुरुचरणी लीन झाले.
ह्या घटनेचा श्री छनुभाईंच्या मनावर खोल परिणाम झाला. त्यांचे मन कशातही लागेनासे झाले. घरी देखील आता गृहकृत्य करण्यासाठी कुणीही बाईमाणुस राहिले नव्हते. तेव्हा श्री नाथुभाईंनी चि. भक्तेश ह्यांचा विवाह लावून देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे चि.सौ.का.वर्षा ह्यांच्याशी विवाह संपन्न झाला. श्री छनुभाईंना ग्रामपंचायतीमध्ये काम मिळाले. ती नोकरी ठीक चालली होती. अशातंच श.१९०५ (इ.स.१९८३) मध्ये श्री नाथुभाईंचा देहांत झाला. एकानंतर एक आलेल्या ह्या दुःखद घटनांनी श्री छनुभाईंचे मन उचाट झाले. श्री नाथुभाईंनंतर श्रीक्षेत्र गुंज संस्थानचे ट्रस्टी श्री छनुभाई झाले. चि. गुंजेश नोकरीमध्ये स्थिर झाल्यानंतर त्याचा विवाह चि.सौ.का.सरयू हिच्याशी श. १९०७(इ.स.१९८६) मध्ये करून देण्यात आला. श्री गुंजेश भाईंना दोन मुली झाल्या. पहिली मुलगी प्राची ही समर्थ सद्गुरु श्री चिंतामणी महाराजांच्या समाधिदिनाच्या दिवशीच (दि. १८/०२/१९८७, माघ व. ४, श. १९०८) जन्मली. त्यामुळे तिला सर्वजण श्री चिंतामणी महाराजांची पवित्र आठवण म्हणून पाहतात. दुसरी मुलगी प्राक्षी (दि. ३१/०१/१९९४ रोजी) जन्मली आणि ज्येष्ठ दोन्ही बंधूंना काही आपत्य नसल्यामुळे श्री राजेशभाईंनी कु. प्राक्षीला दत्तक घेतले.
संस्थानचे दायित्व व सूत्रे
समर्थ सद्गुरु श्री चिंतामणी महाराजांनी श्री योगानंद महाराज श्रीक्षेत्र गुंज संस्थानची सर्व जबाबदारी श्री छनुभाई महाराजांकडे सुपूर्द केली होती. जन्मभर त्यांनी स्वतःला संस्थानमध्ये व्यवस्थापक ह्या नात्याने पाहिले, पीठाधीश म्हणून नव्हे. आपल्या पश्चात् श्री छनुभाईंना सर्वांनी सहयोग करावा, कुणाच्या मनात काही गाठ राहू नये यासाठी श्री चिंतामणी महाराजांची देहांताच्या नंतरही एक लीला सांगितली जाते. श्री चिंतामणी महाराजांच्या १० व्या दिवशीच्या कागबलीश्राद्धाची क्रिया गंगेच्या तीरावर चालली होती. कावळा पिंडाला शिवत नव्हता. खूप वेळ प्रतिक्षा करूनही उपयोग झाला नाही. शेवटी एका भक्ताच्या लक्षात आले की, कावळा पिंडाला शिवत नाही ह्याचा अर्थ महाराजांची काही इच्छा पूर्ण व्हावयाची राहिली आहे. खूप विचार केल्यानंतर सर्वांनी एकमताने एक विचार मांडला की, “संस्थानची जशी सेवा आजवर केली आहे, तशीच पुढे करत राहू. श्री छनुभाई महाराजांना आजन्म सहाय्य करू.” अशी शपथ घेतली तर कसे? सर्वांनी मिळून तसे करताच कावळ्याने पिंड त्वरित उचलले. आपल्या निस्सिम निःस्वार्थ भक्ताची काळजी सद्गुरु अखंड वाहत असतात हेच खरे.
समर्थाचिया सेवका वक्र पाहे।
संस्थानच्या आताच्या जागी पूर्वी स्मशानभूमि होती, निवडुंग, बाभळी आदि दाट काटेरी झाडे होती, घळी होत्या. तशा अवस्थेतून दिव्य वैभवसंपन्न, महिमामंडित, संतजनमान्य संस्थान निर्माण करणे हे अत्यंत दुर्घट काम समर्थ सद्गुरु श्री चिंतामणी महाराजांनी आपल्या जिवाचे, प्राणाचे, सर्वस्वाचे हवन करून पूर्ण केले. पूर्वी जेथे लोक जायलादेखील भीत अशा जागी आता टोलेजंग संस्थान उभे होते. आणि स्वाभाविकंच आहे, काही अविवेकी लोकांना त्या गादीची, त्या पदाची लालसा निर्माण झाली. त्यामुळे “कुठे त्या गुजरातमधील कोण हा व्यक्ति येथे येतो काय आणि क्षणात सर्वकाही आपले करतो काय”, हे त्यांच्या बुद्धिला पटेनासे झाले. वचन देऊनही त्यांची बुद्धि फिरली. त्यामुळे सुरुवातीच्या काळात श्री छनुभाई महाराजांना अनेक अडचणी आणि विरोधाचा सामना करावा लागला. विरोधकांपैकी एकाने तर धर्मादाय आयुक्तांकडे अर्ज देखील केला की, त्यालाच श्री सद्गुरु चिंतामणी महाराजांच्या नंतर गादीचा हक्क देण्यात यावा, पण त्याची ती इच्छा काही पूर्ण झाली नाही. समर्थ सद्गुरु श्री चिंतामणी महाराजांच्या वचनांवर पूर्ण श्रद्धारूपी पुरुषार्थाने ज्याचे ह्रदय ओतप्रोत, सद्गुरुंची ध्यानमूर्ति ज्याच्या ह्रदयात, रोमरोमात भिनलेली आहे, त्या पुरुषव्याघ्राला कुणाचे काय भय! सर्व अडचणींवर दैवी योजनेनुसार उपाय होत गेला. मार्ग निघत गेले, कार्य विस्तार पावत गेले. संत श्री रामदास स्वामींच्या शब्दांमध्ये…
समर्थाचिया सेवका वक्र पाहे। असा सर्व भूमंडळी कोण आहे।।
समर्थ सद्गुरु श्री चिंतामणी महाराजांचे दिव्य मार्गदर्शन
महाराजांना हा प्रदेश, इथली भाषा हे नवीन होते. कित्येकांनी खोडसाळपणे कित्येक वेळा त्यांना चुकीची माहिती देऊन भ्रमित करण्याचा प्रयत्न केला. चुकीचे निर्णय घ्यायला लावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याजवळ गुरुकृपेचे अमोघ शस्त्र होते. पहाटे काकडा आरती होत असताना आणि श्रीमत् प.प.स. योगानंद महाराजांच्या लादणीत जाऊन दर्शन घेत असताना त्यांना नित्य दिव्य मार्गदर्शन होत असे. तेथे झालेल्या मार्गदर्शनानुसार त्यांची वाटचाल होत असे. तेथे झालेले निर्णय ते कदापि बदलत नसत. ही विघ्ने, संकटे, विरोध हा दैवी योजनेचाच भाग होता. त्या प्रत्येक घटनेमधून सद्गुरुंना कोण कसा ह्याची परीक्षा तात्काळ करता आली आणि त्यांनी सूत्रे निर्विघ्नपणे हाताळली. सद्गुरुवचनांवर, कृपेवर दृढ विश्वास ठेवून परमपूज्य सद्गुरु श्री छनुभाई महाराजांनी एक साधे परन्तु प्रभावी तत्त्व नेहमी उराशी बाळगले. ते म्हणजे, समर्थ सद्गुरु श्री चिंतामणी महाराजांच्या काळापासून चालत आलेल्या सर्वच्या सर्व व्यवस्था जशाच्या तशा तंतोतंत चालत राहाव्या, त्यांच्यामध्ये तसूभरही बदल होऊ नये. ह्या योगे सद्गुरुतत्त्व आणि भगवंत ह्यांचे एकीकृत स्वरूप भगवान श्री दत्तात्रेय ह्यांची आराधना, अन्नदानादि नियम अव्याहतपणे पाळले गेले आणि जुन्या-नव्या सर्वंच भक्तजनांची श्रद्धा सद्गुरु श्री छनुभाई महाराजांच्या पायी दृढ झाली.
वाढता वाढता वाढे, भेदिले शून्यमंडळा
समर्थ सद्गुरु चिंतामणी महाराजांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम यथासांग पार पडला. त्यांचा अग्निसंस्कार निशान घाटावर केला होता. त्या ठिकाणी मार्गशीर्ष शु. १५ शके १९१० (दि. २३/१२/१९८८) रोजी त्यांच्या पादुका स्थापन करण्यात आल्या. तेथे समाधिमंदिर बांधण्यात आले. ह्या कार्यक्रमानंतर श्री छनुभाई महाराजांनी अनेक मोठे उपक्रम हाती घेतले आणि त्यांच्या पूर्ततेचा भार लीलया पेलला. संस्थान हे एक आध्यात्मिक केन्द्र आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाला भक्ति, ज्ञान आणि कृपा ह्यांचा प्रसाद अवश्य मिळावा ह्यासाठी संस्थानच्या कार्याचा विस्तार होणे, संस्थानमध्ये मूलभुत सोयींची पूर्तता होणे आवश्यक होते. संस्थानचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथील बांधकाम कधीच थांबत नाही. काही ना काही काम चालूच असते. त्यात आता महाराजांनी खूप मोठे संकल्प करून त्या कामाचे थोर प्रकल्प हाती घेतले.
पट्टाभिषेक
परमपूज्य श्री छनुभाई महाराजांनी दाखविलेल्या कर्तव्यतत्परतेमुळे, त्यांच्या अतुलनीय धैर्यामुळे आणि दिव्य शक्तिंशी त्यांच्या ऐक्याचा प्रत्यय वेळोवेळी आल्यामुळे अनेकांनी श्री महाराजांना अनुग्रह देण्याची विनंती केली. तसे करण्याआधी श्री महाराजांचा पट्टाभिषेक करणे आवश्यक होते. ज्येष्ठ व. १२ शके १९१३ मंगळवार दि. ०९/०७/१९९१ रोजी पट्टाभिषेकाचा सोहळा दिमाखात पार पडला. त्यानंतर परमपूज्य सद्गुरु श्री छनुभाई महाराजांनी हजारो दीन दुबळ्यांना, भाविक भक्तांना आपल्या मायेच्या पंखांखाली सुरक्षित करत गुरुमंत्रदीक्षा देऊन अनुग्रहित केले.
मुख्य सभामंडपाचा जीर्णोद्धार
मुख्य सभामंडपाचे मूळ बांधकाम होऊन आताशा पन्नास वर्षे होत आली होती. त्याचा जीर्णोद्धार करण्याचा समर्थ सद्गुरु श्री चिंतामणी महाराजांचा मानस होता. ते काम आता परमपूज्य सद्गुरु श्री छनुभाई महाराजांनी हाती घेतले व यशस्वीरित्या सिमेंट कॉंक्रिटमध्ये भक्कम बांधकाम पूर्ण केले. मंदिराची वास्तु आजही मजबूतपणे उभी आहे.
भक्त निवास बांधकाम
मुख्य मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याने भ्रमर जसे कमळाकडे आकर्षित होतात, तसे अनेको भक्त संस्थानकडे आकर्षित होऊ लागले. भक्ति उपासना करण्यासाठी, दीक्षा प्राप्त करण्यासाठी त्यांची तळमळ वाढली, संख्याही वाढली. तेव्हा आलेल्या भक्तांसाठी उत्तम आरामदायक रूम्स, स्वच्छतागृहे, ह्यांची व्यवस्था व्हावी म्हणून आधुनिक भक्तनिवासाचे बांधकाम करण्यात आले.
पाकशाळा आणि भोजन कक्ष
राहण्याची सोय तर झाली, पण दररोज आलेल्या भक्तमंडळींना निःशुल्क अन्न प्रसादाच्या रूपात प्राप्त व्हावे म्हणून पाकशाळेचा भाग आणि भोजनकक्षाचा भाग आधुनिक शैलीमध्ये विराट स्वरूपात बांधून काढण्यात आला आहे.
स्वच्छ पेयजल व्यवस्था
संस्थानच्या दैनंदिन उपक्रमांसाठी, अन्न शिजविण्यासाठी, उपासनादिकांसाठी शुद्ध स्वच्छ पाण्याची फार मोठी आवश्यकता होती. गंगेच्या पात्रालगत मोठी विहीर खणून ती व्यवस्था करण्यात आली आहे. आता संस्थानमध्ये बारा महिने पाणी असते. गावात पाण्याचा तुटवडा झाल्यास येथूनंच पाणी देण्यात येते.
गौशाला
संस्थानतर्फे देशी गावरान गायींच्या प्रजाती गोशाळेमध्ये संगोपन केल्या गेल्या आहेत. त्यात मुख्य गीर गायींची पैदास आणि पालन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. संस्थानसंचलित गोशाळेतून प्राप्त दूध, तूप इत्यादि शुद्ध स्वरूपातले असल्यामुळे सर्व धार्मिक विधि, हव्यकव्यासाठी, स्वयंपाकासाठीदेखील ह्या उत्पादनांचा यथायोग्य वापर करण्यात येतो.
परभणी येथील श्री चिंतामणी महाराज मंदिराचे बांधकाम
समर्थ सद्गुरु श्री चिंतामणी महाराजांनी मोठ्या दूरदृष्टीने परभणी येथे दूरचा प्रवास करून येणाऱ्या भक्तजनांसाठी विश्रांतीची सोय व्हावी, जिल्ह्याच्या ठिकाणी श्री योगानंद महाराज संस्थानच्या कार्याचा विस्तार व्हावा ह्यासाठी जागा घेऊन ठेवली होती. त्या ठिकाणी छोटेखानी पण स्वयंपूर्ण अशी वास्तु सुद्धा बांधण्यात आली होती. श्री छनुभाई महाराजांनी ह्याच जागेच्या लगतची जागा खरेदी करून ह्या संपूर्ण जागेवर अतिशय भक्कम व विराट असे मंदिराचे संगमरवरी बांधकाम पूर्ण केले, श्री चिंतामणी महाराजांची मूर्ति स्थापन केली, कलशारोहणाचा कार्यक्रम थाटामाटात पार पडला. आता दरवर्षी येथे विविध वार्षिक कार्यक्रम होतात. त्यात मुख्य म्हणजे मूर्तिस्थापनेचा माघ महिन्यातला सप्ताहोत्सव.
कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते।
ह्या बांधकामांच्या, सृजन-निर्मितीच्या कामांसोबतंच सद्गुरु श्री छनुभाई महाराजांनी हजारो भाविकांना अनुग्रहित केले. त्यांना श्री आत्रेय दत्त महाराजांच्या परंपरेच्या निर्मल प्रवाहात आणले. महाराजांच्या गुरुगौरवाचे कित्येक कार्यक्रम विविध ठिकाणी झाले आहेत. हैदराबाद येथे देखील उत्तम सोहळा पार पडला. महाराजांनी ह्या माध्यमातून श्री दत्तभक्तिच्या प्रसाराचा संस्थानचा मूळ उद्देश फळाला नेला. संस्थानच्या जाज्वल्यतेची कीर्ति दिगदिगंतरात पसरली आहे. संस्थान हे कैक जीवांचे परमाश्रयस्थान, आध्यात्मिक ऊर्जास्थान झाले आहे.
श्वासे श्वासे श्रीदत्तनाम स्मरात्मन्।
श्रीमत् प.प.स. योगानंद सरस्वती स्वामी महाराजांनी लावलेले हे दत्तभक्ति, नामसाधनेचे रोप समर्थ सद्गुरु श्री चिंतामणी महाराजांनी आपल्या प्राणांचे जल सिंचून संस्थानरूपाने जोपासले, मोठे केले. परमपूज्य सद्गुरु छनुभाई महाराजांनी ह्याच संस्थानचे, नामाच्या कीर्तिचे हे दिव्य धन दाही दिशांमध्ये मुक्तपणे उधळले लाखो लोकांपर्यंत पोचते केले. आज संस्थानशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाला नामसाधनेचे महत्त्व विचारून पाहा. साधनेची कित्येक अंगांनी उपासना आज भाविकभक्तजन करत आहेत. श्री महाराजांनी आपल्या प्रत्येक श्वासागणिक नामस्मरणाची साधना स्वतः आचरली आणि तिचाच उपदेश सर्वांना केला.
कम खाना, गम खाना, दम खाना।
नामसाधनेव्यतिरिक्तही श्री छनुभाई महाराजांच्या संपूर्ण शिकवणीचे, उपदेशाचे सार ह्या त्रिसूत्रीमध्ये सामावलेले आहे. ज्याने जीभ जिंकली, त्याला अध्यात्म सोपे. आहारावर नियंत्रण ठेवल्याने अध्यात्मातील अर्धे प्रश्न निकाली निघतात. आपल्याच कर्माचे फळ, प्रारब्ध म्हणून जे दुःख आपल्या वाट्याला आले आहे त्याला “सहनं सर्वदुःखानां अप्रतिकारपूर्वकं। चिन्ताविलापरहितं…” ह्या प्रकारे तितिक्षापूर्वक सहन करणे म्हणजे गम खाना. आणि एवढे करूनही अदृष्टाचे ज्ञान नसल्यामुळे काही गोष्टी मनासारख्या होण्यासाठी वेळ लागतो. कारण “गहना कर्मणो गतिः।” असा विलंब होत असताना धैर्य खचू न देता “हाथ काम मुख राम है, हिरदै साँची प्रीत।” ह्या प्रकारे ईश्वरोपासनेत, नामस्मरणात कालयापन करावे हा संदेश दम खाना ह्या सूत्रामध्ये त्यांनी सर्व भक्तांना दिला आहे. त्यांच्या विशाल अथांग शांत सागरासारख्या व्यक्तिमत्त्वाचे हे रहस्य ज्याने जोपासले, “स तरति, स तरति। स लोकांस्तारयति।” अधिक बोलणे न लगे.
वर म्हटल्याप्रमाणे दिव्य सत्पुरुषांची जीवनचरित्रे ही सामान्यांच्या मनबुद्धिच्या परे असतात. प्रत्येकाची लीला वेगळी, प्रत्येकाचे क्रीडास्थान वेगळे. पण त्यातील सर्वच जणांमध्ये एक गोष्ट समान असते. ती म्हणजे, प्रत्येक साधुपुरुष ह्या ना त्या मार्गाने परमेश्वराची दैवी संपत्ती, ते दिव्य योगैश्वर्य प्रकट करत असतो. समर्थ रामदासांसारखे अवतार रोकडा परमार्थ करून दाखवतात, दुष्टांचा नाश करवितात, भूभार कमी करतात. तर परमपूज्य सद्गुरु श्री छनुभाई महाराजांसारखे महापुरुष शांतरसाचा सागर भासतात, करुणेचा घन (मेघ) वाटतात. आपल्या भक्तांवर अखंड कृपावर्षाव करतात. चुकलेल्याला सन्मार्ग दाखवितात, सन्मार्गावर असणाऱ्या अधिकाऱ्याला आपल्या दिव्य स्पर्शाने ते तत्त्व प्राप्त करून देतात, जे देवतांनादेखील दुर्लभ आहे. श्रुतिंचे वचन आहे… गुरुस्तथैवेशो यथैवेशो तथा गुरुः। ईश्वरात आणि श्री गुरुंमध्ये यत्किंचितही भेद नाही.
सद्गुरु श्री छनुभाई महाराजांच्या परमशांत तरीही विलक्षण समर्थ भाव चेहऱ्यावर असलेल्या विशाल मूर्तिकडे पाहिले तर पाहणाऱ्याचे देहभान विसरते. कलीकाल देखील समोर आला तर ही मूर्ति त्याला आपल्या एका नेत्रकटाक्षाने क्षणात शमवेल असा विश्वास भक्ताच्या मनात जागा होतो. “अपि चेत्सुदुराचारो” च्या कोटीमधील दुराचाऱ्यांमध्ये दुराचारी असलेला जरी कुणी पूर्ण श्रद्धेने श्री सद्गुरुंवर विश्वास ठेऊन त्यांना अनन्य शरण जाईल, तर त्याचे सर्व पापसंताप नाहिसे करून श्री गुरुराज त्याला “साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः।” ह्या उच्चतम स्तरावर नेऊन पोचवतील, ह्यात शङ्का करू नये. श्री नारदांनी श्री वाल्मिकींना मूलरामायणात श्रीरामाची लक्षणे सांगावयास सुरुवात केली. त्यातील खालील श्लोक तर महाराजांच्या परमशांत मूर्तिला चपखल लागू होतो.
समुद्र इव गांभीर्ये धैर्येण हिमवानिव।
विष्णुना सदृषो वीर्ये सोमवत्प्रियदर्शनः॥
सद्गुरुतत्त्वाचे मधुरगुणवर्णन, सद्गुरुंच्या लीलांचे नित्य स्मरण, सद्गुरुंच्या स्वरूपाचे ह्रदयमंदिरामध्ये ध्यान-चिंतन, त्यांची मानसपूजा, त्यांना अनन्यभावाने समर्पण, त्यांच्या वचनांवर निःसिम श्रद्धा… आणखी काय लागते भवसागर तरण्यासाठी?
श्री योगानंद महाराज संस्थान श्रीक्षेत्र गुंजेस या, श्री गुरुकृपेचा लाभ घ्या.
परमपूज्य सद्गुरु श्री छनुभाई महाराज की जय।