समस्तदोषशोषणं स्वभक्तचित्ततोषणम्।
निजाश्रितप्रपोषणं यतीश्वराग्र्यभूषणम्॥
भारतभूमीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या भूमीवर भगवान श्रीदत्तात्रेयांचे अवतार कार्य निरंतर चालू असणे हे होय. हा अवतार जसा सद्गुरू स्वरूप आहे. तसाच भक्तवत्सल आहे. म्हणूनच तो योगी व संतांना अतिशय प्रिय आहे. केवळ स्मरणमात्रे संतुष्ट होणारा आहे व स्मरताच दर्शन देणारा आहे.
अवतार कथा
ब्रह्मा, विष्णु व महेश या तीन देवांनी ब्रह्मदेवाचे पुत्र असणाऱ्या अत्रिऋषिंच्या तपावर प्रसन्न होऊन त्यांना स्वतःचेच दान दिले. जगाचा उद्धार निरंतर होत राहावा यासाठी अत्रि-अनसूयेच्या पोटी भगवान दत्तत्रेयांचा अवतार घडून आला. पुत्र प्राप्त व्हावा यासाठी महर्षि अत्रिऋषिंनी पर्वतावर तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन तीनही देवांनी अत्रिऋषिंना दर्शन दिले व आमच्यासारखा पुत्र मिळण्यासाठी झालेल्या परिश्रमाची फलप्राप्ती होण्यासाठी सकलात्मक हा आत्मा आम्ही तुला दिला. असा वर देऊन हे तिन्ही देव गुप्त झाले. त्यानंतर महर्षि अत्रिंच्या पुढे चतुर्भुज दत्तात्रेय प्रकट झाले; पण “त्यांचे लालन-पालन करणे कसे शक्य आहे.” अशी शंका अत्रि व अनसूया यांच्या मनात उत्पन्न झाली. तेव्हा माझ्या अंशापासून उत्पन्न झालेले, उत्तम यश-किर्ती वाढविणारे सुपुत्र तुम्हाला होवोत असा वर त्या भगवंताने त्यांना दिला.
एकदा नारदांनी अनसूयेच्या पातिव्रत्याची स्तुती, पार्वती, लक्ष्मी व सावित्री यांच्याजवळ केली. तेंव्हा त्यांच्या मनात असूया निर्माण होऊन त्यांनी आपल्या पत्नींना अनसूयेचे सत्व हरण करण्यासाठी प्रेरित केले. सायंकाळच्या वेळी अत्रिऋषिंच्या घरी अतिथी होऊन “आम्हाला अन्न दे” असे तीन देव अनसूयेला म्हणाले; पण निर्वस्त्र होऊन अन्नदान करण्याची अट त्यांनी घातली.
तेव्हा ब्राह्मणरूपात आलेल्या ब्रह्मा, विष्णु, महेश या तीन देवतांचे रूपांतरण बालकांत झाले. महर्षि अत्रिऋषि त्यावेळी घरी नव्हते. ते घरी आल्यावर त्यांनी सर्व झाला प्रकार जाणला व तीनही देवतांची स्तुती केली. नंतर नारदांच्या सांगण्यावरून पार्वती, लक्ष्मी व सावित्री ह्या अनसूयेच्या घरी आल्या; पण आपापल्या पतीचे रूप न ओळखू आल्याने लाजल्या. अनसूयेने त्यांचे पती ओळखून दिले व सर्वांची स्तुती केली. त्यावेळी दत्तात्रेयांनी द्विभुज अवतार धारण केला.
कौशिक ब्राह्मणाची पत्नी आपल्या पतीला खांद्यावर घेऊन प्रतिष्ठान नगरीतील एका वेश्येकडे नेत असतांना, शूळावर असलेल्या मांडव्य ऋषिंना त्या ब्राह्मणाचा धक्का लागला. त्यामुळे कळवळून, सूर्यादय होताच हा मृत मावेल असा शाप त्यांनी दिला. हा शाप ऐकून त्या पतिव्रता स्त्रीने सूर्यालाच उगवू नये असा शाप दिला व दुसऱ्या दिवशी सूर्य उगवलाच नाही. अंध:काराने सर्व जगाला पीडा झाली. सर्वांची नित्यकर्मे थांबली. तेव्हा ब्रह्मादि देवांनी अनसूयेला विनंती करून तिला पैठण येथे कौशिकाच्या घरी आणले. देवांच्या विनंतीनुसार अनसूया माता त्या ब्राह्मणाच्या घरी आली व त्या प्रतिव्रतेला आपला शाप मागे घेण्याचे सुचविले. तसेच सुर्योदय झाल्यावर तुझ्या पतीला मी उठवीन याची ग्वाही दिली त्यामुळे त्या पतिव्रतेने सूर्याला उदयास ये अशी आशा दिली. त्या सरशी सुर्योदय घडून आला पण तिचा पती गतप्राण झाला. तेव्हा अनसूयेने आपल्या सामार्थ्याने त्या ब्राह्मणाला जीवंत केले. यावेळी सगळे देव आनंदले व देवांनी, “हे प्रतिव्रते, तुझ्या कुशीत हे जन्मातीत ब्रह्मा, विष्णु व महेश अवतरतील” असा वर दिला. या वराच्या प्रभावाने मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला बुधवारी सायंकाळी मृगनक्षत्रावर भगवान दत्तत्रेयांचा षड्भुज अवतार प्रकट झाला. ब्रह्मदेवाचा अंश असलेले चंद्रदेव व महेशाचा अंश असलेले दुर्वासा हे आई वडीलांची आज्ञा घेऊन स्वकार्यासाठी निघुन गेले; पण विष्णुंचा अंश असलेले श्री दत्त घरीच राहिले. त्यांनी आपल्या लीलांनी अत्रि-अनसूयेचा आनंद द्विगुणीत केला व भक्तकार्यासाठी ते सिध्द झाले. भक्त काजासाठी त्यांनी योगिराज, अत्रिवरद, दत्तात्रेय, कालाग्निशमन, योगिजनवल्लभ, लीलाविश्वंभर, सिध्दराज, ज्ञानसागर, विश्वंभर, मायायुक्त, मायामुक्त, आदिगुरु, शिवरूप, देवदेव, दिगंबर, कृष्णश्यामकमलनयन असे सोळा अवतार धारण केलेले आहेत.
प्राचीन काळात भगवान दत्तात्रेयांनी यदु, अलर्क, प्रह्लाद, परशुराम, नहुष, कार्तवीर्य या भक्तांचे कल्याण केले. तसेच या काळातही त्यांचे हे कार्य सतत चालू आहे. त्यांच्या अवतार कार्याला समाप्ति नाही. या आधुनिक काळातही ते भक्तांना वरदान देण्यासाठी सज्ज असतात. म्हणूनच श्रीमत्, प.प.स.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या एका प्रसिद्ध पदामध्ये स्वचित्ताला उपदेश केला आहे की,
आठवी चित्ता तु गुरुदत्ता।
जो भवसागरपतितत्राता॥
आहे जयाचे कोमल ह्रदय।
सद्यचि हा भवहरिवरदाता॥
पाप पदोपदी होईल जरी तरी।
स्मरता तारी भाविक भक्ता॥
संकट येता जो निजअंतरी।
चिंती तया शिरी कर धरी त्राता॥
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त