॥दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा॥
संस्थानसंबंधी विविध सूचना येथे प्रसारित करण्यात येतील.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

श्री योगानंद महाराज संस्थान श्रीक्षेत्र गुंज माहिती

अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। >>>
श्री योगानंद महाराज की जय। >>>
समर्थ सद्गुरु श्री चिंतामणी महाराज की जय। >>>
परमपूज्य सद्गुरु श्री छनुभाई महाराज की जय। >>>


श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे मराठवाडा परिसरात दोन वेळा आगमन झाले होते. एका वेळेस श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु योगानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच श्री गांडा महाराज देखील त्यांच्या सोबत होते. नरसी येथील चातुर्मास्याचे वेळी व राजूर येथे पू. श्री सीताराम महाराजांनी केलेल्या गायत्री स्वाहाकारासाठी श्री थोरले महाराजांचे आगमन झाले होते. जिंतूर, बामणी, उटी, आजेगाव, साखरा, गंगामसला, गुंज, गौंडगाव इत्यादि सर्व परिसर आपल्या पदस्पर्शाने पुनित करतानाच दिव्य दृष्टीने पुढील कार्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी त्यांनी जागेचाही विचार पक्का केला. त्या दृष्टीनेच श्री योगानंद महाराज ह्यांना त्यांच्या घरी जाऊन आईवडीलांची सेवा कररण्याची आज्ञा दिली व स्वतः चिखलद्याचा चातुर्मास करण्यासाठी रवाना झाले. यथावकाश श्री गरुडेश्वरी स्थूल देहाचा त्याग करून श्री गांडास निर्मोह झाल्यानंतर संन्यास देऊन दक्षिणेत जाण्याची आज्ञा केली. आईवडीलांच्या निधनानंतर साधारणतः शके १८४१ सालामध्ये संन्यास दीक्षा घेऊन डाकोरला श्री कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराजांकडून दंडदीक्षा ग्रहण करून श्रीमत् प.प.स. योगानंद सरस्वती स्वामी महाराज ही योगपट्टातील बिरुदावलीचे नामाभिधान धारण केले. त्यानंतर पहिला भडोच येथील चातुर्मास दुसरा नासिक येथे तर तिसरा अनावल येथे करून शके १८४३ नंतर मराठवाड्यात प्रवेश केला आणि आपले वास्तव्याचे गुंज हेच स्थान निश्चित केले. गोपेगावला कायम वास्तव्याची जवळपास सगळी तयारी झाली असताना सुद्धा ईश्वरप्रेरणेने गुंजेस आले व श्री सिद्धेश्वर महादेवाच्या मंदीरात वास्तव्य केले. फाल्गुन व. १२ शके १८५० ला श्री दत्तपदी लीन होण्यापूर्वी दीड महीना अगोदर माघ शु. १२ शके १८५० ला १०-११ वर्षाच्या चुणचुणीत मुलाला पुढील कार्यासाठी नियुक्त केले. तेच हे परमपूज्य समर्थ सद्गुरु श्री चिंतामणी महाराज. त्या दिवसापासून आयुष्याचा शेवटचा श्वास घेईपर्यंत ज्या उद्देशासाठी झिजले तेच हे श्रीक्षेत्र गुंज संस्थान. सिद्धेश्वर मंदीरालगत ज्या दोन लादण्या होत्या त्यातील श्री योगानंद स्वामी महाराजांचे वास्तव्य असलेल्या लादणीत वस्त्रसमाधि करून बरोबर घरचे देव सुद्धा तेथेच ठेऊन पूजाअर्चा सुरु केली. येणारा येईल, भव्य मंदीर निर्माण करील हे स्वामींचे बोल अक्षरशः खरे झाले.

श्री योगानंद महाराजांच्या समाधीची पूजाअर्चा त्यावेळी श्री बापूदेव दडके करीत असत. श्री चिंतामणी महाराज सुद्धा तेथे मजूर म्हणून काम करू लागले. दोन्हीही लादण्यांची व श्री सिद्धेश्वर मंदीराची पश्चिमेकडील भिंत पडलेली होती. गंगेची डगर श्री सिद्धेश्वर मंदीराच्या भिंतीपर्यंत आलेली होती. समोरच स्मशानभूमी होती. आजूबाजूला गर्द निवडुंगाचे वन होते. श्री दत्तमहाराजांची आज जेथे मूर्ती आहे, तेथे त्याखाली एक मोठी घळ होती आणि गावातील सगळे पाणी तेथून येत असे. थोडक्यात काय तर दिवसा देखील भय वाटावे अशी ही परिस्थिती होती. तेथील झाडेझुडुपे, निवडुंग इत्यादि तोडून जागा साफ करणे, घळ बुजवणे, जमीन समतल करणे ही कामे करावी लागली. श्री दत्तमूर्ती स्थापण्याचे निश्चित झाले व बांधकामाला वेग आला. शके १८५४ ला सुरु झालेले बांधकाम पुढे ४-५ वर्षे सातत्याने चालत राहिले. सुरुवातीला पूर्वेकडील भिंत घेऊन तात्पुरते पत्रे टाकून पाकशाळा तयार केली गेली. श्री बापूदेव दडके स्वयंपाक नैवेद्य पूजा सगळे करीत. श्री चिंतामणी महाराजांनी स्वतः केले नाही असे एकही काम नाही. हिवऱ्याची, निवडुंगाची झाडे तोडणे, पाया खोदणे, भरणे, चुन्याच्या भट्ट्या काढणे, बैल चारणे, वैरण आणणे, चुनखडी वेचून आणणे, एक ना अनेक छोटी मोठी कामे सातत्याने चालत… त्यांच्या कष्टाला सीमाच नव्हती. शके १८५८ ला सभामंडप पूर्ण झाला. री भिंती गंगेच्या प्रवाहाला मागे सारून बांधून मध्ये गाभारा बांधला व शके १८५८ ला श्री दत्तमूर्तीची साग्रसंगीत थाटात प्रतिष्ठापना झाली. जो दिव्य सोहळा झाला, त्यापूर्वीच एकमुखी दत्तमूर्ती बसविण्याचा बेत झाला होता. त्याला नकार म्हणून की काय, क महीन्यावर कार्यक्रम आलेला असताना सभामंडपाचा नैऋत्य कोनाचा भाग ढासळला. तो ताबडतोब दुरुस्त करून ठरल्यावेळेस श्री दत्तमूर्तीची स्थापना झाली. चारी वेदांचे २१० विद्वान ब्राह्मण बोलावून गायत्रीचे २४ लक्ष जपानुष्ठान पूर्ण करून झाले व सतत सात दिवस भव्यदिव्य असा कार्यक्रम संपन्न झाला. श्री दत्तमूर्ती थोरल्या महाराजांनी रचलेल्या ध्यानाच्या श्लोकामध्ये वर्णन केल्याप्रमाणे आहे. तिच्या अधः(सर्वात खालच्या) दोन हातांमध्ये माळ आणि कमंडलू आहे. मधल्या दोन हातांमध्ये डमरू आणि त्रिशूल आहेत. तसेच ऊर्ध्व (वरच्या) दोन करांमध्ये शंख आणि चक्र आहेत. अशी सहा हात आणि तीन शिरे असलेली प्रसन्न लोचन, सुहास्य वदन मूर्ती भक्तांचे कल्याण करत तेथे अहोरात्र उभी आहे, दक्ष आहे. मूर्तीच्या उजव्या बाजूस श्री टेंबे स्वामींचा चांदीचा मुखवटा व डाव्या भागात श्री योगानंद स्वामींची तसबीर आहे. महाराजांसोबतचे देव व पालखीतील उत्सवमूर्ती तेथेच आहे. मूर्ती गोमातेला टेकून उभी असून चारी वेदांचे प्रतिनिधित्व करणारे चार श्वान आजूबाजूस आहेत. अतिशय मनोहर मूर्ती आहे. नित्य उपासनेने त्यात अलौकीक असे तेज निर्माण झाले आहे. ही मूर्ती बालस्वरूप असलेली अतीशय तेजस्वी तपोमूर्ती आहे, असे श्री महाराज म्हणत. कोवळी काकडी सुद्धा आतील किंचित कठिण बिया काढून मगंच नैवेद्याला अर्पण करण्याचा प्रघात आहे. तेथे खारीक नुसते तुकडे करून सुद्धा श्री दत्तमहाराजांना चालत नाही. उष्ण पाणी चालत नाही, समशीतोष्ण असावे लागते. बासुंदीचा नैवेद्य दाखवावयाचा म्हणजे तो देखील गरम चटा न बसावा ह्यासाठी आधी पाण्यात बासुंदीची वाटी ठेऊन थंडावा आल्यानंतर मगच नैवेद्य दाखवावा लागतो. राजस सुकुमार मदनाचा पुतळा आहे श्री दत्तमूर्ती! एकंदर काय तर आई जशी लहान बाळाचा सांभाळ करते तद्वतच ही उपासना अव्याहत आणि सश्रद्ध चालू आहे.

श्री दत्तसंप्रदायातील मुख्य वैशिष्ठ्य म्हणजे आचारसंपन्नता. आजही सभामंडपात अशौचकाळ संपेपर्यंत कुणीही व्यक्ती जाऊ शकत नाही. स्त्रीयांना अस्पर्श काळात सभामंडपात जाण्यास मनाई आहे. एवढेच नाही तर काकड्याची पंचपदी सुरु होईपर्यंत स्नान केल्याशिवाय कोणीही व्यक्ती प्रवेश करू शकत नाही.

दर गुरुवारी मंदीराभोवती प्रदक्षिणा करणारी पालखी एका तख्तावर सभामंडपात ठेवलेली आहे. काही वर्षांपूर्वी श्री चंद्रकांत सावळीकर ह्यांच्या चित्रकलेल्या आविष्कारातून ५२ अध्यायी श्री गुरुचरित्र रेखाटलेले आहे. ते सभामंडपात चोहीकडे फिरून पाहता येईलसे भिंतीवर लावलेले आहे.

श्री चिंतामणी महाराजांनी बांधलेले सभामंडपाचे चुन्यात बांधकाम झालेले होते व लोखंडी कैचीवर तारस पद्धतीने होते. साधारणतः १९९२ साली सभामंडप पूर्ण आरसीसी पद्धतीने बांधून त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला.

सभामंडपात श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आणि श्री योगानंद सरस्वती स्वामी महाराज ह्या दिव्यद्वयीचे  दोन मोठे फोटो आहेत. भिंतींवर सुद्धा जागोजागी सुंदर चित्रे लावलेली आणि रेखाटलेली आहेत. त्यात आता समर्थ सद्गुरु श्री चिंतामणी महाराज आणि परमपूज्य सद्गुरु श्री छ्न्नुभाई महाराज ह्यांच्या तसबीरींनी शोभा आणखीच वर्धयमान झाली आहे.

श्री योगानंद महाराज लादणी

श्री सिद्धेश्वर मंदीरात श्री योगानंद महाराज सुरुवातीला आले. त्या उंच मंदीराखाली दोन लादण्या आहेत. त्यातील दक्षिणेकडील लादणीत साफसफाई करू श्री स्वामींना वापरासाठी दिली. नित्य आह्निक, ध्यानधारणा करून समोरील ओट्वर आराम करीत असत. दुसऱ्या उत्तरेकडील लादणीत भांडारगृह करून येणाऱ्या भक्ताची सोय करीत. ह्याच लादणीत श्री स्वामींनी फाल्गुन व. १२ शके १८५० रोजी देह ठेवला. तेथे त्यांची वस्त्रसमाधि करून चांदीचा मुखवटा बसविला आहे. ह्याच समाधिमधून श्री चिंतामणी महाराजांस नित्य दर्शन व बोध होत असे. अग्निहोत्री बुवांचे प्रकरण, श्रीममती केशरबाई (श्री योगानंद महाराजांच्या पूर्वाश्रमातील पत्नी) ह्यांचे आगमनाचे वेळी श्री महाराजांस समाधितूनच स्पष्ट दर्शन व आज्ञा झालेल्या आहेत.

ज्या ओट्यावर श्री योगानंद महाराज आराम करीत तेथे श्री चिंतामणी महाराज योगाभ्यास करीत असत. गुजराथी भक्तांच्या आग्रहाखातर शके १९१८ साली श्र योगानंद महाराजांची भव्य मूर्ती शास्त्रोक्त विधीने स्थापन करण्यात आली. गुजराथी ब्रह्मवृंदाद्वारेच जप, पाठ, हवनविधी सभामंडपात पूर्ण झाले. वस्त्रसमाधीच्या मागील भागात पूर्वाभिमुख ही मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे.

श्री चिंतामणी महाराज मूर्ति

समर्थ सद्गुरु श्री चिंतामणी महाराजांनी माघ व. ४, शके १९०८  (दि. १८/०२/१९८७) रोजी अनंतात देहविलय केला. तत्पूर्वी संस्थानची सूत्रे पू. श्री योगानंद महाराजांचे पुतणे श्री छन्नुभाई महाराजांच्या स्वाधीन केली होती. मंदीराया नूतनीकरणाचा ध्यास घेऊन त्यांनी बांधकाम प्रगतीपथावर ठेवले. नवीन पाकशाळेचे बांधकाम करून पूर्वीच्या नैवेद्याच्या स्वयंपाकाच्या जागेवर बांधकाम करून समर्थ सद्गुरु श्री चिंतामणी महाराजांची संगमरवरी मूर्ती स्थापित करण्यात आली.

एका पुण्यतिथी उत्सवाच्या सप्तात गुरुमूर्तीचरित्र, गुरुचरित्र, परायण करून जलाधिवास, धान्याधिवास आदि शास्त्रीय सोपस्कार करून श्री दत्तयाग केला आणि पूर्णाहूतीस श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा म.म. श्रीमान् यज्ञेश्वरशास्त्री कस्तूरे ह्यांच्या हस्ते झाली. त्यावेळेस “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” ह्या मंत्राचा पुरश्चरण जप करून सोहळा संपन्न झाला माघ व. ४, दि. १ मार्च १९९४ रोजी ही मूर्तीस्थापना झाली.

श्री सिद्धेश्वर महादेव मंदीर

गुंजेस येणारे भाविकभक्त प्रथम श्री दत्तमहाराजांचे दर्शन घेऊन लादणीत श्री योगानंद महाराजांचे दर्शन घेतात. त्यानंतर श्री सिद्धेश्वर बाबाजींचे (स्वयंभू महादेव लिंगाचे) दर्शनास जातात. गुंज गावातील हे एक पुरातन मंदीर आहे. दक्षिणवाहिनी गंगेच्या तटावर वसलेले. वास्तविक गुंज हे गाव पाच महादेवांच्या मूर्तींनी वेढलेले आहे. त्यातील श्री सिद्धेश्वर महादेव हे एक शिवपीठ. १०-१५ फूट उंच असणाऱ्या टेकडीवर हे मंदीर जुने जमीनदार असणारे चौधरी कुटुंबातील एक भक्तिमयी स्त्री आबई चौधरी ह्यांनी बांधलेले असल्याचे सांगितले जाते. गाभारा व सभामंडप अशी दगी पक्की बांधणी. समोर नंदी. लगत दोन लादण्या. समर्थ सद्गुरु श्री चिंतामणी महाराज म्हणत की, संस्थानचे सर्व बांधकाम ह्याच श्री सिद्धेश्वर मंदीराला आधार धरून बांधलेले आहे. आजुबाजूला प्रशस्त गच्ची व चढण्यासाठी पायऱ्या ही श्री चिंतामणी महाराजांनी केलेली रचना होय. ह्याच मंदीरात प्रथमतः श्री योगानंद महाराजांचे वास्तव्य झाले होते. तदनंतर श्री गुरुमूर्तिचरित्र ग्रंथ लेखनाची सुरुवात देखील येथेच झाली.

श्री चिंतामणी महाराज नित्य ह्या महादेवास सकाळसंध्याकाळ रात्री पूजित असत. बिल्वार्पण करीत असत. त्यावेळी पाऊस चालू असेल तरी त्यांच्या अंगावर पावसाचे पाणी पडत नसे ही घटना बघितलेले लोक आजही सांगू शकतील. येथे सोमसूत्री प्रदक्षिणा घालतात.

श्री कैलास व कार्यालय

श्री सिद्धेश्वर मंदीरासमोरं नऊ खणी माळवद टाकून महाराजांनी माडी करून घेतली. श्री किशनकाका आडगावकरांची ही सेवा आहे. या जागेला कैलास म्हणतात. श्री सिद्धेश्वर महादेवाला महारुद्र स्वाहाकार करताना किंवा बेलाच्या समाप्तीला इथेच पुण्याहवाचनाचा कार्यक्रम होतो. त्याशिवाय दर रविवारी सकाळी श्री चिंतामणी महाराज येथे येऊन बसत. त्यावेळी जागा शेणाने सारविण्याची सेवा तत्त्कालीन सावकार देवीदास चक्रवार ह्यांच्या मंडळींकडे (सौभाग्यवतींकडे) असे. पारायणासाठी किंवा नित्य ब्राह्मणांचे सोवळे वाळत टाकण्यासाठी ही जागा वापरतात. ह्या दरवाज्वर नागाचे चित्र लाकडी नक्षीमध्येच काढलेले आहे. त्याचे पूजन श्री नागपंचमीच्या दिवशी संस्थानच्या पुजाऱ्यामार्फत केले जाते. ह्याच माडीखाली संस्थानचे कार्यालय व गादी आहे. येथे महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा नाही.

संग्रहालय

श्री सिद्धेश्वर महादेवाला प्रदक्षिणा घालतानाच सभामंडपाच्या बांधकामामध्ये काढलेल्या खास अशा चित्र आणि वस्तुसंग्रहालयाच्या दालनाचे दर्शन होते. श्री चिंतामणी महाराजांनी वापरलेल्या वस्तुंपैकी काही जतन करून ठेवलेल्या आहेत. पनवेलचे फोटोग्राफर आलेले असताना त्यांनी वेळोवेळी काढलेल्या श्री महाराजांच्या वेगवेगळ्या छायाचित्रांची रचना येथे मोठ्या फ्रेममध्ये केलेली आहे.

श्री महाराज बसावयास घेत तो पाट, ते खेळत तो दशावताराचा खेळ, संध्यावंदनेची उपकरणे, श्री महाराजांची खूर्ची अशा विविध वापरातल्या वस्तुंची जपणूक तेथे केलेली आहे. “सत्पुरुषांची वस्तुमात्र। ती जाणावी पवित्र” ह्या उदात्त सश्रद्ध भावनेतून, धारणेतून हे वस्तुदालन संरक्षित ठेवलेले आहे.

कार्यालय

सिद्धेश्वर मंदीराचे दर्शन घेऊन खाली येताना लहान खिडकीतून गादीचे दर्शन होते. गादी म्हणजे परंपरा. या गादीवर कोण महाराज आहेत, ती ही गादी. आधुनिक वर्णनाप्रमाणे हे कार्यालय आहे. येथे संस्थानचे जमाखर्चाचे व्यवहार, ने आण, पूर्वी होत असे. आता आधुनिक संगणकयुक्त कार्यालयातून हे व्यवहार होतात. दरवर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजन हे येथेच कार्यालयात होत असते. देवतांचे, महाराजांचे फोटो भक्तांसाठी येथे ठेवलेले आहेत. येथे समई तेवत असून सकाळी व सायंकाली दिवाबत्ती केली जाते. सायंकाळी मंगलवाद्ये वाजत आहेत तोपर्यंत कार्यालय उघून ठेवले जाते.

कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत एक पेव आहे. आधुनिक मंडळींना समजणार नाही हे पेव. पूर्वीच्या काळी जमीनीखाली खोल खणून ते चिरेबंदी दगडाने बांधून घेत असत. त्यात पायऱ्या उतरून जाण्याची सोय असे. ज्वारी, इ. धान्य मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यासाठी हे पेव उपयोगात आणित असत. घट्ट झाकण टाकून वरून सुद्धा हे पेव बुजवित असत. उपयोग करताना झाकण कून त्यात भरपूर प्राणवायू आहे किंवा नाही ह्याची खात्री पेटलेला दिवा आत सोडून केली जाई आणि मगंच खाली पेवात प्रवेश केला जाई. भरपूर म्हणजे ५० क्विंटल किंवा अधिक धान्य बसेल एवढ्या जागेचे पेव बांधत असत.

उत्सवात पालखी कार्यालयापुढे थांबवून तेथे विविक्षित पदे म्हणण्याचा प्रघात आहे. येथूनंच पुढे उत्तरेकडील लादणीत जाण्याचा मार्ग आहे.

उत्तरेकडील लादणी

उत्तरेकडे जी लादणी आहे, त्यात श्री चिंतामणी महाराज विश्राम करीत असत. पुढील काळात श्री छन्नुभाई महाराज वैयक्तिक उपासना येथे करीत. गुरुमंत्र देण्याचे काम सुद्धा येथूनंच केले जाई. सध्या येथे श्री योगानंद महाराजांची गादी, जिचे दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीस्वरूपात पूजन केले जाते, ती ठेवलेली आहे. श्री चिंतामणी महाराज व श्री छन्नुभाई महाराज ह्यांच्या चांदीने मढविलेल्या पादुका येथेच ठेवलेल्या आहेत. भक्तांच्या इच्छेप्रमाणे पूजनाची सेवा करता येते. श्री गंगेचेच पाणी पिण्याचा श्री चिंतामणी महाराजांचा नियम होता. बाहेरगावी जाताना देखील गंगेचे पाणी ज्या तांब्याच्या टाक्यांमध्ये भरून नेत त्या येथे संग्रही ठेवलेल्या आहेत. शअरी चिंतामणी महाराज विश्राम करत असताना ह्याच लादणीत सापाने त्यांच्या पायाला दंश केला होता.

परमपूज्य सद्गुरु श्री छन्नुभाई महाराज विश्रांतीस्थान

त्यानंतर परमपूज्य सद्गुरु श्री छन्नुभाई महाराज ज्या खोलीमध्ये बसत आणि निजत असत ती ही खोली. एकांताची आवड असल्यामुळे एकदम शेवटची खोली त्यांनी निवडली. येथेच उठणे बसणे होते. पुढे पुढे महाराज जेवण, चहा देखील येथेच घेत असत. आणि नंतर गुरुमंत्र देण्यासाठी सुद्धा महाराज ह्या खोलीच्या बाहेर पडले नाहीत. ह्या खोलीसमोरंच व्हरांड्यात मोठी आरामखुर्ची टाकून महाराज तेथे बसत असत. भक्तांना दर्शन देत, त्यांच्याशी हसतमुखाने आनंदात वार्तालाप करत ते तेथे बसलेले असत. आजही तिकडे दृष्टी गेल्यास महाराज बसलेले असल्याची जाणीव होते. श्री महाराजांनी त्याच मार्गाने लादणी, कार्यालय, असे करत करत सभामंडपात येऊन श्री दत्त महाराजांना प्रदक्षिणा घालून श्री चिंतामणी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे. तत्पूर्वी पाठीमागे  भक्तांच्या उपासनेसाठी महादेवाची पिंड ठेवलेली आहे. कुणीही भक्त तेथे जलाभिषेक करून बिल्वपत्र वाहू शकतो. इ.स. २०१६ च्या कार्तिक शु. १२ ला श्री महाराजांनी अवतारकार्याची समाप्ति केली. श्री चिंतामणी महाराजांच्या शेजारीच दि.१५ मे २०१९ रोजी श्री छन्नुभाई महाराजांची मूर्तिस्थापना करण्यात आली.

औदुंबर

शके १८५८ च्या फाल्गुन महिन्यात श्री दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना झाल्याचे आपण पाहिले. श्री दत्तमूर्तीला मंगलस्नान घालताना एक चमत्कारंच झाला. स्नानाचे पाणी जेथे जेथे गेले, तेथे तेथे औदुंबराची रोपे उगवली. त्यातील एक रोप जोपासले. तोच हा दिव्य औदुंबर वृक्ष. औदुंबराच्या त्रिकाल दर्शनाचा महाराजांचा नियम होता. आज देखील एक गम्मत बघायला मिळते. ती म्हणजे औदुंबराचे खोड हे तीन ठिकाणी त्रयमूर्तीसारखे दिसते. जणू श्री दत्त भगवानच त्रिमुखाने तेथे उभे आहेत.

नवीन लेख व पोस्ट्स

जयघोष – अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त – चिंतन

श्रीक्षेत्र गुंज येथे आणि संस्थानचे भक्तांकडून इतरत्रही प्रत्येक कार्याच्या आरंभी ते फळाला जाण्याच्या हेतूने व संक्षेपाने स्वस्तिवाचनार्थ श्री गुरुपरंपरेचा खालीलप्रमाणे जयघोष केला जातो. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती

अधिक वाचा »

समर्थ सद्गुरु श्री चिंतामणी महाराज
मूर्ति प्रतिष्ठापना वर्धापन दिन उत्सव
सप्ताह - वर्ष २६ वे

श्री गुरुदेव दत्त।

प्रिय गुरुबंधु,
समर्थ सद्गुरु श्री चिंतामणी महाराज मूर्ति प्रतिष्ठापना वर्धापन सप्ताह उत्सव, परभणी येथील श्री चिंतामणी महाराज मंदिरात दि.३०-०१-२०२५ ते दि. ०४-०२-२०२५ ह्या सप्ताहात साजरा होणार आहे.
उत्सवामध्ये भक्तांना आनंद प्रदान करणारे भरगच्च कार्यक्रम होतात. सर्व कार्यक्रमांचे बाबत अधिक माहिती व पत्रिका प्राप्त करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

Contact us
If you are interested or have any questions, send us a message.
I am very interested
Send Message