श्रीक्षेत्र गुंज येथे आणि संस्थानचे भक्तांकडून इतरत्रही प्रत्येक कार्याच्या आरंभी ते फळाला जाण्याच्या हेतूने व संक्षेपाने स्वस्तिवाचनार्थ श्री गुरुपरंपरेचा खालीलप्रमाणे जयघोष केला जातो.
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त।
सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय।
सद्गुरु कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराज की जय।
सद्गुरु योगानंद सरस्वती स्वामी महाराज की जय।
श्रीमद् गोदातीरवासी श्री सिद्धेश्वर महाराज की जय।
हरिहरेश्वर महाराज की जय।
कमलजा माता की जय।
गङ्गा माता की जय।
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त।
श्री योगानंद महाराज की जय।
समर्थ सद्गुरु श्री चिंतामणी महाराज की जय।
परमपूज्य सद्गुरु श्री छनुभाई महाराज की जय।
येथे सद्गुरुपरंपरेसह श्री सिद्धेश्वर बाबा (श्रीक्षेत्र गुंज संस्थानातील श्री महादेव), हरिहरेश्वर बाबा (संस्थानसमोर श्री गोदावरीच्या पात्रातील महादेव), कमलजा माता (श्री योगानंद महाराजांच्या समाधिमंदिराचे समोर घाट उतरून गेल्यावर गंगेच्या पात्रात जो डोह लागतो, तेथे श्री कमलजा मातेचे दिव्य वास्तव्य आहे) यांचाही समावेश केला गेला आहे.
मनोभावे हा नामघोष करताच आपण श्रीक्षेत्र गुंज येथेच आहोत असा भाव भाविक भक्तांमध्ये जागृत होतो. मग कुणी संकटात असो, सुखात असो वा दुःखात त्या भक्ताला संपूर्ण गुरुपरंपरेचा जणु दिव्य स्पर्शंच ह्या नामघोषाद्वारे होतो. त्याचे भय, दैन्य, दुःख तात्काळ नाहिसे होते. त्याला आपल्या सद्गुरुंच्या सर्वसमर्थ सान्निध्यात असल्याचे वाटते. “”आता माझी गुरुमाउली, माझी निर्मल गुरुपरंपरा, माझे सिद्धेश्वरबाबा आणि माझी गंगामाय माझ्या जवळ आहे. कृपादृष्टीने माझ्याकडे पाहत आहे. आता मला कशाची भीति, कशाचे दैन्य, कसली दुर्बलता. आता माझा सारा भार श्री सद्गुरुनाथांवर. मी आता त्यांना शरण आहे. त्यांच्या पावन चरणांशी लीन आहे.””
बळीयाचा अंगसंग जाहला आता। नाही भय चिंता तुका म्हणे॥
शुद्ध, सात्विक आणि स्थिर मन, निर्भय मन हे यशाचे पहिले गमक आहे. प्रारब्धानुरूप जो भोग भोगणे आवश्य आहे, जेणेकरून आपली कर्मांपासून मुक्ति होईल, त्या भोगांमधूनही सद्गुरुमाउली आपल्याला कडेवर घेऊन तारून नेते.
दुःखाचे दुःख हेच खरे दुःख होय. त्यापासून आपल्याला तात्काळ सुटल्याचा अनुभव येतो.
पंचपदीच्या आरंभी तर हा नामघोष केलाच जातो, परंतु कुठलेही शुभ कर्म, कुठलेही महत्त्वाचे काम करण्याच्या आधी हा पवित्र जयघोष आवर्जून करतात.
श्री गुरुदेव दत्त।
“