श्रीक्षेत्र गुंज हे मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील पाथरी या शहरापासून १०-१२ कि.मी. अंतरावर गोदावरी नदीच्या काठी वसलेले एक लहानसे गावं. येथे श्री.सिध्देश्वर बाबांचे प्राचीन मंदिर असून खाली दोन लादण्या आहेत. येथे प.प.स.वासुदेवानंद सरस्वती महाराजांचे पट्टशिष्य प.प.स.योगानंद सरस्वती स्वामी महाराजांचे काही काळ वास्तव्य होते. या शिवालयालगत भव्य असे भगवान श्री दत्तात्रेयांचे मंदिर बांधण्यात आले. श्री दत्त संस्थानच्या उभारणीत प.प.स.योगानंद महाराजांचे पट्टशिष्य प.पू.समर्थ स.चिंतामणी महाराजांचे फार मोठे योगदान आहे.
श्रीमत् प.प.स.वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) कोंकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माणगावचे. श्रीमत् प.प.स.योगानंद महाराज (गांडा महाराज) गुजराथ प्रांतीय आणि प.पू.समर्थ स.चिंतामणी महाराज मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील सावळीचे. हे तिघेही सत्पुरूष एका विशिष्ट हेतूनेच पृथ्वीवर अवतरित झाले असावेत असेच वाटते.
श्रीमत् प.प.स.वासुदेवानंद सरस्वतींच्या आज्ञेनेच श्रीमत् प.प.स.योगानंद महाराज दत्तभक्तीचा प्रसार करण्यासाठी मराठवाड्यात आले व गोदावरीच्या काठी गुंजगावात स्थिरावले. प.प.स.योगानंद महाराजांच्या कृपाशिर्वादानेच प.पू.स.चिंतामणी महाराजांनी त्यांची आज्ञा प्रमाण मानून संस्थानाची उभारणी करून प्रचंड कार्य केले व दत्तभक्तीचा प्रसार केला.
प.पू.समर्थ स.चिंतामणी महाराज यांचा जन्म श्रावण वद्य अष्टमी शके १८३९ मध्ये रात्री १२ वा. म्हणजे श्रीकृष्णजन्माष्टमीचे दिवशी श्री मारोतीदेव जोशी व माता अहिल्या यांच्या पोटी झाला. ते यजुर्वेदांतर्गत कण्व शाखेचे भारद्वाज गोत्रीय ब्राह्मण होते. त्यांना दोन जेष्ठ बंधू आत्माराम, पुंडलीक व एक बहिण बायना होती. दुधना नदी काठी असलेले गोगलगाव हे त्यांचे आजूळ (जेथे त्यांचा जन्म झाला).
सावळी हे गाव परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहारापासून १० कि.मी.अंतरावर आहे.
शिक्षण-
योग्य वयात महाराजांचे शिक्षण चालू झाले. जिंतूर, नांदेड व नंतर मानवत येथे मिडल म्हणजे सातवी पर्यंत झाले.
बालपण-
साडेतीन-चार वर्षांचे असतांना पितृशोक. शिक्षणाकरीता मानवतला जाण्यापूर्वी आईसोबत दैठणा येथे मावशीकडे गेले असता मातृशोक झाला. खोड्या उनाडक्या हा स्वभाव-धर्म. भीती हा शब्दच त्यांना माहिती नव्हता. समवयस्क मुलांना म्हणायचे माझ्या पाया पडा आणि म्हणा, महाराज आम्हाला खडीसाखर द्या. नदीच्या पाण्यातील चुनखडीचे खडे महाराज त्यांना देत व ते साखरे प्रमाणे गोड लागत असत. सावळी गावाजवळ ओढ्याच्या काठी असलेल्या श्री नीलकण्ठेश्वर महादेव मंदिरात, मारोती मंदिरात आणि गोसाव्याचा मठ तेथे जाऊन ते निर्भयपणे बसत. एकदा संध्याकाळी अंधार पडल्यावर दारात उभे असतांना जाळाचा गोळा त्यांच्या दिशेने येतांना दिसला त्यात हनुमानाचे दर्शन झाले. पतंग उडविण्याचा छंद होता आणि त्यामुळेच गृहत्याग केला.
श्री सद्गुरु भेट-
प.प.स.योगानंद महाराजाचा श्रीदत्त मंदिराचे माडीचे कामासाठी जिंतूर येथे दोन महिने मुक्काम होता. दररोज समाराधना होत असे आणि रोजच प.पू.चिंतामणी महाराज प्रसादासाठी जात असत. तेथे त्यांनी स्वामींचे दर्शन घेतले की स्वामी एकच प्रश्न विचारीत तो म्हणजे अभ्यास कसा चालला आहे? प.पू.चिंतामणी महाराज तेव्हा तिसरीचे विद्यार्थी होते.
माघ शुध्द शके १८५० ला महाराजांची बाभूळगांव येथे एका लग्न समारंभात त्यांचे मावसे श्री विनायक बुवा व मावसभाऊ श्री दत्तात्रय (दत्त मास्तर) यांची भेट झाली व तेथून सर्वजण गुंजेस त्यांच्या मावशीकडे आले. त्यावेळी प.प.स.योगानंद महाराजाचा मुक्काम गुंज येथील श्री सिध्देश्वर मंदिराच्या खाली असलेल्या लादणी मध्ये होता.
माघ शुध्द व्दादशीस सकाळी श्री गोदावरी मातेचे स्नान करून महाराज व श्री दत्तामास्तर स्वामींचे दर्शनासाठी आले तेव्हा स्वामींनी महाराजांची विचारपूस केली व “आम्हाला मिडल (सातवी पास) ची सनद देता येत नाही. परंतू वकीलीची सनद देता येते” असे म्हणून बटव्यातील चिमुटभर अंगारा-विभूती महाराजांच्या हातावर ठेवली व म्हणाले अंगारा जपून ठेव महाराजांनी अंगारा चाटून पुसून खाल्ला व हात सर्वांगास पुसले. नंतर कमंडलूतील तीन पळ्या पाणी हातावर टाकले व ते पिण्यास सांगितले तसे महाराजांनी केले तेव्हा स्वामी महाराज म्हणाले ‘आता तू सर्व जगाचा वकील झालास’ हाच कृपाशिर्वाद आणि शक्तीपात दीक्षा. यानंतर स्वामी व महाराजांची भेट झाली नाही.
त्यानंतर दीडच महिन्यांनी फाल्गुन वद्य व्दादशीला श्रीमत् प.प.स.योगानंद सरस्वती स्वामी (गांडा महाराज) यांनी गुंज येथे समाधिस्थ होऊन निजलोकी गमन केले.
श्रीमत् प.प.स.योगानंद महाराजांचे पश्चात तेथील सर्व जबाबदारी प.पू.श्री.बापुदेव दडके, स्वामींचे निष्ठावान व अनुग्रहीत शिष्य जे पाथरीचे होते त्यांच्यावर सोपविण्यात आली. स्वामींचे धाकटे बंधू श्रीरघूनाथजी देसाई (रघुकाका), श्रीरामशेठ तोतला, चौधरी मंडळी कार्यकारणी सदस्य होते. प.पू.श्री चिंतामणी महाराजही सेवक म्हणून तेथे राहिले. श्री बापुदेव महाराजांना चिंतामणी महाराजांबद्दल खूपच आत्मीयता, कर्तृत्वशक्तिबद्दल विश्वास, चारित्र्याबद्दल आदर, उपासनेबद्दल वचक आणि तापटपणाची काळजीही वाटत होती. महाराजांचा बेडरपणा, कर्तबगारी, प्रसंगावधान, साहस, सद्गुरुंबद्दलची असीम निष्ठा, संस्थानविषयी परोकोटिचा अभिमान त्यांनी जाणला होता. प्रत्येक निर्णयात महाराजांचा सल्ला घेण्याचा ते आग्रह धरत असत. मंदिराचे बांधकामासाठी जागा खरेदी / कब्जा, बांधकाम साहित्य, मान्यता, कामगारांचा खर्च शिवाय दैनिक कार्यक्रम, उत्सव यासाठी लागणारा पैसा / धान्य उपलब्ध होण्यामध्ये अनंत अडचणी आल्या. विरोधकांचा त्रास / अडवणूक होत असे या सर्वांवर मात करण्यासाठी महाराजांना वेगवेगळ्या उपाययोजना करतांना खूप कष्ट करावे लागले. पैसा उभा करण्यासाठी गुंजेस पोष्ट ऑफीस सुरू केले. कापसाचा व्यापार केला. धान्य खरेदी-विक्री, जिनिंग फॅक्टरी भाड्याने घेऊन चालविली. “विठ्ठल दत्तात्रेय” या नावाने हुंडी चालविली.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात वाणीसंगम हे क्षेत्र आहे. तेथे वाणीनदी व गोदावरीचा संगम झाला आहे. काकस्पर्शाने येणारा अपमृत्यू येथे स्नान केल्याने नाहीसा होतो. येथून जवळच असलेल्या सोनपेठ येथे महान दत्तभक्त विरसनीकर बाळा महाराजांचा मुक्काम होता. त्यावेळी प.पू.चिंतामणी महाराज वढवणीच्या छगनलाल सोनी सोबत दर्शनासाठी गेले होते. तेव्हा नित्याप्रमाणे बाळामहाराज ध्यान करीत असता ध्यानात श्रीदत्त मूर्ति ऐवजी लाल रंगाची शाल पांघरून निजलेला माणूस येऊ लागला. तेव्हा चौकशीअंती लाल शाल पांघरलेला माणूस दुसरा कोणी नसून प.पू.चिंतामणी महाराज होते. तेव्हा बाळा महाराजांनी आपल्या शेजारी पाट मांडून प.पू.चिंतामणी महाराजांना जेवावयास बसविले व परम श्रेष्ठ दत्तभक्त म्हणून जाहिर केले.
संस्थानची गादी व महाराजांचे काम….
गुंज संस्थानची गादी मूलत: संन्यासीपीठाची होती. परंतू प.प.स.योगानंद महाराजांनी समाधी घेतल्या नंतर स्वामींचे शिष्य आणि नैष्ठिक ब्रह्मचारी प.पू.श्री बापुदेव दडके यांना गादीवर बसविले. त्यांच्या नंतर गादीवर कोणास बसवावे या विषयी मतभिन्नता होती. सोनगड येथे प.पू.रघुकाकांना प.प.स. योगानंद महाराजांनी स्वप्नात दिलेल्या आदेशानुसार गादीवर श्री चिंतामणी सावळीकर यांचीच योजना केली.
प.पू.समर्थ स.चिंतामणी महाराज गुंज संस्थानच्या गादीवर पीठासीन असले तरी स्वत:ला महाराज म्हणवून न घेता व्यवस्थापक समजून प.प.स.श्री योगानंद महाराजांच्या आज्ञेनुसारच कार्य करीत असत. महाराज स्वत: राजयोगी होते. कर्मनिष्ठ, कर्मोपासक, निष्ठावान सेवक, संस्थानबद्दल सार्थ अभिमान बाळगणारे होते. त्यांची स्वामींच्या पुढे चिठ्या टाकून निर्णय घेण्याची / परवानगी घेऊनच कार्य करण्याची पध्दत होती.
महाराज महान शिवोपासक व दत्तोपासक होते. बालपणापासून संपूर्ण हयातभर रात्री शिवाला विल्वपत्र वाहण्याचा उपक्रम चालविला.
श्रीदत्तपंचपदी व ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा’ या नाममंत्राचा जप नियमितपणे केला. प.प.योगानंद स्वामींकडून पंचपदीचे पुस्तक बालपणीच मिळाले होते. योगाभ्यास केला.
मंदिरचे तसेच घाटाचे व फरशीचे बांधकाम केले. मंदिरात श्रीदत्तमूर्तीची स्थापना केली. तसेच दैनिक पूजा अर्चनेचे नियम घालून दिले, त्यांचे आजतागायत पालन होते. भरपूर अन्नदान केले. गोरगरीबांना व गरजूना आपत्काळी विविध प्रकारे मदत केली. शेतीचा विकास केला, आधुनिक यंत्र सामुग्री, ट्रॅक्टर, पिठाची गिरणी आणली. हत्ती, उंट, घोडे या सारखे प्राणी पाळले. देवासाठी सोन्याचांदीचे दागिणे, भांडी उपकरणे जमविली. संस्थानची आर्थिक भरभराट झाली.
शिष्य संप्रदाय वाढविला. त्यांच्या करिता सेवेच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या. उदा.आणेवारी, देवाला अभिषेक, अन्नदान व इतर देणग्या, दत्तभक्ती रुजविली व प्रसार केला.
संस्थानचे कार्य करतांना अनेकांचे जीवन सुधारले. अनेकांच्या व्यावहारिक तसेच प्रापंचिक व पारमार्थिक समस्या सोडविल्या. ‘अभयास देतसे सद्गुरु शरणागता’.
श्रीमत् शंकराचार्य, प.पू.प्रल्हाद महाराज साखरखेर्डेकर, महान भागवतकार डोंगरे महाराज, वासुदेव-निवास पुणेचे प.पू.योगीराज गुळवणी महाराज यांच्या सारखे अनेक संत तसेच वेदविद्या विभुषित ब्रह्मवृंद, ज्योतिषी, योगी, कलाकार, वैद्य संस्थान मध्ये येऊन गेले. त्यांचा यथायोग्य मानसम्मान झाला. तसेच कांही उपद्रवी मंडळीही येवून गेली. त्यांच्या कर्मानुसार त्यांचीही संभावना झाली.
महाराजांनी कार्य करीत असतांना अनेकवेळा चमत्कारही करून दाखविले. अपंग व्यक्तिला चालविणे, मुक्यास बोलते करणे, वांझ व्यक्तिंना अपत्य प्राप्ती होणे, काहीना पुत्रप्राप्ती, मृत व्यक्तींस जीवन दान देणे, परीक्षा (पेपर) न देताहि पास / उत्तीर्ण होणे, दुर्धर व्याधितून मुक्त करणे, विवाह होण्यातील अडचणी नाहीशा करणे, नोकरी मिळणे, वांझ महिषीला दोहविणे यासारखे अनेक चमत्कारही केले.
महाराजांचे दहा गुरुगौरवदिन उत्साहाने पार पडले. अंबडच्या गुरुगौरवाचे वेळी श्री दत्तामास्तरांचे निधन झाले. उत्तरोत्तर महाराजांचीहि प्रकृती खालावत चालली होती. सावळी येथील गुरुगौरवाचे वेळी महाराज अंथरूणावर बसनूच होते. शेवटचा उत्सव सातोन्यास झाला. तेव्हा त्यांना परभणीस आणण्यात आले. दुसरे दिवशी महाराज बेशुध्द झाले. तशातच दोन दिवसानंतर माघ वद्य ४ शके १९०४ दिनांक १८.०२.१९८७ रोजी रात्री पावणे तीनचे सुमारास महाराज निजधामास गेले. अंत्यविधी दुसरे दिवशी गुंजेस कमलजा डोहावरील घाटावर झाला.