॥दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा॥
संस्थानसंबंधी विविध सूचना येथे प्रसारित करण्यात येतील.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज

विदर्भातील कारंजा या गावी भगवान श्री दत्तात्रेयांनी नृसिंह सरस्वती या नावाने कलियुगातील आपला दुसरा अवतार धारण केला. श्रीपाद श्रीवल्लभ या अवतारात अंबिका नावाच्या ब्राह्मणीला दिलेल्या वचनानुसार त्यांनी अंबा व माधव या दांपत्याच्या पोटी जन्म घेतला. त्यांच्या जन्मकाळी कोणत्याही ग्रहाचा अस्त नव्हता. सर्व ग्रह अनुकूल होते. सिध्दीपूर्वक संन्यासाचा संकेत देणाऱ्या प्रव्रज्या योगाने युक्त अशा शुभ मुहुर्तावर, उष्णता आणि थंडी यांचे साम्य असतांना, साधुजनांवर अनुग्रह करण्यासाठी भगवान दत्तप्रभु स्वतः प्रणवाचा उच्चार करीत अवतरले. बालपणीच त्यांनी आईवडीलांना दोन चमत्कार दाखविले. आईला पुरेसे दूध येत नव्हते व ती त्यामुळे चिंतेत होती, त्यावेळी त्यांनी स्तनांना स्पर्श करताच आईचे दुध वाढले. तसेच आपल्या हाताच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने केले, पण तरीही या बालकाचा अधिकार त्यावेळी आई-वडील ओळखू शकले नाहीत. बाळ तीन वर्षांचे झाले तरी बोलत नाही ही चिंता आई-वडीलांना होती. तेव्हा मी मौंजीबंधनानंतर बोलेन असे खुणेनेच त्यांची दाखविले म्हणून माधव भटजींनी आपल्या या पुत्राची मुंजच केली. मुंज होताच त्यांनी वेदपठण केले व ते आपल्या माता-पित्यास म्हणाले की, “मी विरक्त आहे. या क्षणभंगुर देहाचा भरवसा नाही. तो पडण्यापूर्वीच ज्ञान झाले नाही तर मोक्ष मिळणार नाही. पुन्हा जन्म घ्यावा लागेल. त्यामुळे मी लगेच शास्त्राच्या आज्ञेनुसार श्रवणादिंच्या अनुष्ठानासाठी संन्यास घेत आहे.तरी मला अनुज्ञा द्यावी”, पण मातेने अनुज्ञा दिली नाही. तेंव्हा श्रीनृसिंह सरस्वती आपल्या आईला म्हणाले की, “माझ्या या उपक्रमाला अडसर होऊ नकोस, तुला आणखी मुलगा होईल. माझ्या ध्यानाने तू हा भवसागर तरून जाशील.” नंतर त्यांनी आपल्या मातेला आपले दिव्य परमेष्ठी रूप दाखविले ते रूप पाहिल्यावर मातेच्या पूर्वस्मृती जागृत झाल्या व ती माता त्यांना म्हणाली की, “आपल्या उपक्रमाला मी विघ्न करीत नाही. माझ्या चित्तात हे आपले रूप स्थित व्हावे. तसेच आम्हाला पुत्र होईपर्यत आपण येथेच राहावे अशी माझी प्रार्थना आहे.” या मातेच्या प्रार्थनेमुळे ते थांबले. पुढे या मातेने दोन छानशा बाळांना जन्म दिला. ती जुळी बाळे तीन महिन्यांची झाली. मग श्रीगुरु मातेला म्हणाले की, “आता तुला दोन पुत्र झाले आहेत, पुढे आणखी दोन पुत्र आणि एक मुलगी होईल आणि तीस वर्षांनी मी पुन्हा तुला भेटेन.” आधी दिलेल्या वचनाप्रमाणे मातेला अनुज्ञा द्यावी लागली.

श्रीनृसिंह सरस्वतींनी मातेचा निरोप घेतला व ते मुमुक्षुचा वेषधारण करून बदरिकाश्रमाच्या वाटेवर काशीला येऊन थांबले. तेथे त्यांनी श्री कृष्णसरस्वतींना गुरु करून संन्यास घेतला आणि नृसिंह सरस्वती हे नांव धारण केले. काही काळ काशी येथे राहून त्यांनी आपल्या शिष्यांचे कल्याण केले. नंतर मेरूपर्वताला सव्य प्रदक्षिणा करून गंगासागर आदी तीर्थस्थानांना भेटी देऊन ते प्रमाण क्षेत्री आले. तेथे माधव नावाच्या ब्राह्मणाला त्यांनी संन्यास दिला व पुढे ते आपल्या जन्मभुमीला आले.

बालसरस्वती, कृष्ण, उपेन्द्र, ज्ञानज्योती, सदानंद, माधव आणि सिध्द ह्या सात मुख्य शिष्यांसह इतर अनेक, शिष्य त्यांच्या सोबत त्यावेळी होते. कारंजा येथे आल्यावर त्यांनी आईवडील, बंधु बहिण व पुर्वाश्रमातील इतर संबंधी लोकांची भेट घेतली व एकाचवेळी अनेक रूपे धारण करून सर्वांची पूजा स्वीकारली. आईवडील त्यांची पूजा करीत असतांना त्यांच्या आईची पूर्वस्मृती पुन्हा जागृत झाली व तिने श्रीगुरुंची प्रार्थना केली की, “हे श्रीपादा, भगवंता…तू माझा मुलगा नाहीस तर साक्षात हरि आहेत. मला या संसार सागरातून तार. तू आम्हास या मायेपासून सोडव.” तेव्हा “तुम्ही उभयता काशीक्षेत्री  मुक्ती पावाल”, असा आशिर्वाद श्रीनृसिंह सरस्वतींनी आईला दिला. त्यांची पुर्वाश्रमातील बहिण रत्नाबाई हिने आपले भवितव्य विचारले असता, तुझा नवरा संन्यास घेऊन जाईल व तुझ्या शरीराला कुष्ठरोग होईल पण तो माझ्या दर्शनाने नाश पावेल असे सांगितले नंतर कारंजा येथील गोदावरीला गेले. तेथे माधव नावाच्या तपस्वी मुनीला उपदेश देऊन त्याला संसारातून मुक्त केले. गोदावरीतीराने पुढे गेल्यावर गळ्यात धोंडा बांधून आत्महत्या करायला निघालेला एक ब्राह्मण त्यांना दिसला. त्या ब्राह्मणाची पोटशूळाची व्यथा ऐकून त्याला श्रीगुरु म्हणाले की, “भिऊ नकोस मी वैद्य आहे. तुला अन्न पचावे असे दिव्य औषध मी तुला देतो.” त्यांचा हा संवाद होत असतांनाच कडगंजी येथे राहणारा कौंडिण्य गोत्र असलेला सायंदेव नावाचा ब्राह्मण तेथे आला. तो म्लेंच्छांची चाकरी करीत होता. त्याने श्रीगुरुंना नमस्कार घातला. तेव्हा श्रीगुरुंनी या ब्राह्मणास गोड अन्न दे असे सांगितले. त्या ब्राह्मणाची अवस्था माहिती झाल्याने आपल्याला ब्राह्महत्येचे पातक लागणार तर नाही ना अशी शंका सायंदेवाने व्यक्त केली. तेंव्हा “काहीही शंका न घेता चारीठाव भोजन याला दे”, असे श्रीगुरुंनी सांगितले. सायंदेवाने ते मान्य करून आपल्या घरी सर्वांना भोजनासाठी आमंत्रित केले. श्रीनृसिंह सरस्वती, सर्व शिष्य व तो ब्राह्मण सायंदेवाच्या घरी गेले. सायंदेवाने श्रीगुरुंची उत्तम उपचारांनी पुजा व आरती केली आणि सर्वांना षडरसांनी युक्त असे भोजन वाढले. तो ब्राह्मणही ते अन्न खाऊन निरोगी झाला. नंतर सायंदेवाने श्रीगुरुंना प्रार्थना केली की, “मला आणि माझ्या वंशाला आपले अव्यभिचारी आणि श्रद्धापूर्वक दास्य द्यावे. माझा स्वामी असलेला क्रूर म्लेंच्छ प्रतिवर्षी एका ब्राह्मणाला ठार करतो व त्यासाठी आज मला त्याने बोलावले आहे.” अशी आपली चिंताही व्यक्त केली. त्यावर श्रीगुरुंनी त्याला आश्वासित केली की, “तो तुझा सत्कार करील व तू आनंदाने परत येशील. चिंता सोड !” आणि तसेच घडले. सायंदेवाने परत आल्यावर श्रीगुरुंसोबत येण्याची इच्छा दर्शविली तेव्हा “सोळा वर्षांनी तुला माझे दर्शन घडेल” असे आश्वासन देऊन श्रीनृसिंह सरस्वती परळी वैजनाथला आले व तेथे गुप्तपणे राहिले. तेथे त्यांनी गुरुद्रोह करणाऱ्या एका ब्राह्मणाला त्याच गुरूंना शरण यायला लावून त्याचे कल्याण केले. नंतर श्रीगुरु कृष्णेच्या तीरावर आले. श्रीक्षेत्र कोल्हापूर येथील मंदबुद्धी असलेल्या व भुवनेश्वरी देवी प्रसन्न व्हावी म्हणून आपली जीभ कापून टाकलेला एक मुलगा देवीच्या दृष्टांतानुसार श्रीगुरुंना शरण आला. श्रीगुरुंनी त्याच्या मस्तकावर आपला हात ठेवला व त्याचे ऐहिक व पारलौकिक कल्याण केले. श्रीगुरुंनी कृष्णावेणी या पंचनद्यांसह आणि आठ तीर्थांनी युक्त असा संगम पाहून त्याच्या पश्चिमतीरावर औदुबंराच्या तळाशी वास केला व आपल्या स्वरूपाची तिथे विशेषत्वाने स्थापना केली. हेच स्थान आता श्रीक्षेत्र नृसिंह वाडी (नरसोबाची वाडी) ह्या नावाने प्रसिद्ध आहे.

एकदा अमरापुर येथे वैदिक आणि नम्र अशा ब्राह्मणाच्या घरी त्यांनी भिक्षा घेतली. त्यावेळी गृहिणीने घरात काहीच अन्न नसल्याने घेवड्याच्या शेंगांची भाजी श्रीनृसिंह सरस्वतींना अतिथीभावाने वाढली. भक्तीने अर्पण केलेली ती भाजी खाऊन भगवंत तृप्त झाले आणि त्यांनी जाताना अंगणातला घेवड्याचा वेल तोडून टाकला. जेव्हा त्या तोडलेल्या वेलीचे मूळ खोदून काढले तेंव्हा तिथे द्रव्याने भरलेला घडा मिळाला. अशा प्रकारे त्यांचे दारिद्रय श्रीगुरुंनी दूर केले. त्यानंतर मात्र ते भिक्षेसाठी कोठे गेले नाहीत. ते योगिनींची पूजा घेत राहिले. तेव्हा तेथील ब्राह्मणांच्या मनात हे संन्यासी भिक्षेशिवाय कसे जगतात याची उत्सुकता लागुन राहिली पण त्याचे रहस्य त्यांना कधी कळले नाही.

औरवाड येथे राहणारा गंगानुज नावाचा एक भक्त श्रीगुरुंच्या दर्शनासाठी आला. तेव्हा त्याने असा चमत्कार पाहिला की, कृष्णा नदी पाण्याने भरलेली असूनही तिने श्रीगुरुंना वाट करून दिली आहे व श्रीगुरु नदीच्या आत जाऊन तेथे असणाऱ्या एका रत्नजडित सिंहासनावर बसलेले असून चौंसष्ठ योगिनींची पूजा ते स्विकारीत आहेत. गंगानुजही तेथे गेला. त्याला पाहून श्रीगुरुंनी त्याची विचारणा केली व तू जे येथे पाहिलेस हे कुणाला सांगु नकोस असे सांगितले तो आपल्या गावी शेतीवर परतला. त्यावेळी त्याला शेतीत अमाप पीक प्राप्त झाले. तो शेतकरी रोज येऊन औदुबंराची पुजा करीत असे. एकदा त्याने काशीक्षेत्रातील त्रिस्थळी पुजेविषयी विचारणा केली असता श्रीगुरुंनी गंगानुजाला योगगतीने त्रिस्थळीची यात्रा घडविली. आता हे स्थान त्यागून दुसरीकडे जाण्याचा विचार श्रीगुरुंनी केला त्यावेळी योगिनींनी आम्हाला सोडून जाऊ नका अशी विनवणी केली. श्रीगुरुंनी त्यांची समजूत काढली व औदुंबराच्या तळवटी आपल्या मनोहर पादुकांची स्थापना केली आणि ते योगिनींना म्हणाले की, हे क्षेत्र सुप्रसिध्द होईल. येथे खूप लोक येतील. ज्याला ज्याला ज्याची इच्छा असेल ते त्याला येथे नेहमीच लाभेल. येथे जप, होम, देवपुजा यांचे कोटिपट फळ मिळेल. नंतर श्रीनृसिंह सरस्वती भीमा तीरावर असणाऱ्या गाणगापूर येथे गेले. मात्र वाडी येथील पादुकांची पुजा करणाऱ्या भक्तांची पाठराखण सद्गुरु पूर्वीप्रमाणेच करीत. शिरोळ गावातील जन्मतःच मृत होणाऱ्या अर्भकांच्या मृत्यूमुळे त्रस्त असलेल्या पिशाच्च असलेल्या एका ब्राह्मण स्त्रीस पिशाच्चबाधेपासून मुक्त केले व तिच्या मृत झालेल्या पुत्राला जिवंत केले.

गाणगापूरला आल्यावर भक्तांचा उद्धार करण्यासाठी त्यांनी भिक्षा घेण्यास सुरूवात केली. एका ब्राह्मणाच्या घरी भिक्षेच्या निमित्ताने जाऊन त्याच्या अंगणात असलेल्या वांझ म्हशीला दुभते केले. ही वार्ता राजाच्या कानी पोचली. तेव्हा त्याने श्रीगुरुंचे स्त्री लवाजम्यासह येऊन दर्शन घेतले व आपल्या नगरात येण्याची विनंती केली. राजाने त्यांना पालखीत बसवून आपल्या नगरात आणले. तेथे प्रवेश करताच एका पिंपळाच्या झाडावर एक भयानक आणि घातक ब्रह्मराक्षस त्यांना दिसला. श्रीगुरुंच्या दर्शनाने तो राक्षस एकदम शांत झाला व त्याने वंदन करून या योनीतून मुक्त करण्याविषयी याचना केली. श्रीगुरुंनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवताच त्याचा देह मानवसदृश्य झाला. सद्गुरुंनी त्याला संगमावर स्नान करून तू मुक्त होशील असे सांगितले व त्याने तसे करताच तो ब्रह्मराक्षस कर्मबंधनातून मुक्त झाला. हा चमत्कार पाहून राजाने त्यांना गाणगापूरला एक सुंदरशी मठी बांधून अर्पण केली व तो राजा श्रीगुरुंचे नित्यनेमाने पूजन करू लागला. कुमसी  गावच्या त्रिविक्रम भारती या संन्याशाला मात्र हे रुचले नाही. तो त्यांना दांभिक समजू लागला. तेव्हा त्याला खरे स्वरूप दाखविण्यासाठी ते छत्र-चामरादि राजचिन्हांनी सजविलेल्या पालखीत बसवून राजाने श्रीगुरुंना कुमसी गावी नेले. त्रिमिक्रम भारती हे नृसिंहाचे ध्यान करीत असत, पण श्रीगुरु तेथे आल्यावर नृसिंहाचे रूप त्यांच्या ध्यानात येईना. तेव्हा त्यांनी नृसिंहाचे स्तवन केले व ते नदीकाठी आले. तेथे त्यांना जिकडे तिकडे लहान मोठे खूप संन्यासीच दिसू लागले. त्यामुळे ते गोंधळून गेले व त्यांनी प्रभूंची प्रार्थना केली. तेव्हा श्रीगुरु पूर्वरूपात प्रकट झाले. त्यांनी विश्वरूपाचे दर्शनही त्रिविक्रम भारतींना घडविले. नंतर त्यांना उपदेश करून श्रीनृसिंह सरस्वती आपल्या मठात परतले.

म्लेंच्छ राजाच्या सांगण्यावरून वाद करण्यासाठी दोन ब्राह्मण त्रिविक्रम भारतीकडे आले. त्यांनी वाद करण्याविषयी त्रिविक्रम भारतींना सांगितले तेव्हा त्रिविक्रम भारतींनी त्यांना श्रीगुरुंकडे नेले. श्रीगुरुंनी ब्राह्मणांनी वाद करू नये, नसता त्यांची विद्या लुप्त होऊन ब्रह्मराक्षसाची योनी प्राप्त होते असे त्या ब्राह्मणांना समजावून सांगितले, पण त्या ब्राह्मणांनी ऐकले नाही. शेवटी त्यांचा हट्ट पाहून समोरून जाणाऱ्या एका वाटसरूला बोलावून व सात रेषा त्याला ओलांडायला लावून, त्याची पूर्वस्मृती श्रीगुरुंनी जागृत केली व त्याच्याशी त्या ब्राह्मणांना वाद घालण्यास सांगितले. ते पाहून ते ब्राह्मण घाबरले व त्यांनी उद्धार करण्याची प्रार्थना केली.

माहूर येथील गोपीनाथ या धनाढ्य ब्राह्मणाच्या मुलाला क्षय झाला. त्याची पत्नी महान पतिव्रता होती. तिने सर्व उपाय व व्रतवैकल्ये केली पण रोगाचा परिहार झाला नाही. शेवटचा उपाय म्हणून ती आपल्या पतिला घेऊन गाणगापूरला जाण्यासाठी निघाली, पण दैवयोगाने गाणगापूर जवळ येताच प्रवासाच्या शीणामुळे तिच्या पतिचे प्राणोत्क्रमण झाले. त्या धक्क्याने त्रास होऊन तिथे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण इतरांनी तिला त्यापासून रोखले. त्यावेळी तेथे एक साधू आला. त्याने तिला पतिव्रताधर्माचे कथन केले व तिला सद्गुरुचे दर्शन घेण्यास सांगितले. पतिच्या कानात गळ्यात रूद्राक्ष घालावे व कपाळावर भस्मलेपन करून सद्गुरुंच्या पायाचे तीर्थ पतिच्या शरीरावर शिंपडावे असेही साधूने त्या पतिव्रतेला सांगितले. त्यानुसार सर्व तयारी करून ती पतिव्रता श्रीगुरुंचे दर्शन घेण्यासाठी संगमाकडे निघाली. श्रीगुरु समोर येताच तिथे त्यांना नमस्कार केला. तेव्हा श्रीगुरु “सौभाग्यवती हो” असे म्हणाले आणि पुन्हा प्रेमाने “अष्टपुत्रा हो” असेही म्हणाले. ते ऐकून तेथे असलेल्या लोकांनी श्रीगुरुंना सत्य परिस्थतीचे कथन केले. तेव्हा श्रीगुरुंनी ते प्रेत आपल्याजवळ आणायला लावले व रुद्रमंत्रानी अभिमंत्रित केलेल्या जलाने त्यास स्नान करविले. तोच त्या स्त्रीचा पति झोपेतून उठावे तसा उठला. मग श्रीगुरुंनी त्या उभयताना “तुम्ही दीर्घायुषी, आरोग्य संपन्न, पुत्रवान व धनवान होऊन लोकांमध्ये पूज्यता पावाल” असे आशिर्वचन दिले व त्या साध्वीला सोमवार व्रताचा महिमा कथन केला.

गाणगापूरात परान्नचा गोड घास मिळावा म्हणून तक्रार करण्याचा ब्राह्मणस्त्रीचा हा मोह श्रीगुरुनी दूर केला. भास्कर ब्राह्मणाची शुद्ध भक्ती पाहून त्याच्या जवळ असलेल्या अल्प अन्न-सामुग्रीतून चार हजार लोकांना अन्नदान घडविले. दिवाळीत एकाच वेळी वेगवेगळ्या गावी राहणाऱ्या सात भक्तांच्या घरी श्रीगुरु राहिले. गंगा नावाच्या सतिला साठ वर्षांच्या वयानंतरही संतान प्राप्ती करून दिली. तंतुकाला श्रीशैल्याची यात्रा योगमार्गाने घडविली. नरहरी ब्राह्मणाचे कुष्ठ दूर केले. आपला भक्त असणाऱ्या शेतकऱ्याला शेतातले पीक कापून टाकायला सांगून अमाप पिकाचे धनी त्याला केले. पूर्व आयुष्यात कुरुगड्डी येथे रजक असलेल्या पण या जन्मात राजा झालेल्या भक्ताची पीडा दूर केली. त्यानंतर श्रीनृसिंह सरस्वती श्रीशैल्य पर्वतावर गेले व आता दृष्यमान स्वरूपात राहू नये असा विचार त्यांनी केला.

सद्गुरुंच्या या लीलांमागे हाच हेतू होता की, स्नेहाने वा लोभाने कशाही प्रकारे लोकांनी आपली भक्ती करावी. आपल्या भजनाविना लोकांना मोक्षाची योग्यता येणार नाही, पण त्यांना तर भजनात अजिबात रस नाही. त्यामुळे त्यांच्या सांसारिक इच्छा पुरवून त्यांच्यातील प्रत्युपकाराची भावना जागवावी आणि अशारीतीने त्यांना आपल्या भक्तीला लावावे यासाठीच अशा विविध लीला भगवंतस्वरूपी श्रीगुरुंनी केलेल्या आहेत.

आजही भक्तांचा उद्धार करण्यासाठी श्रीगुरु प्रात:काली नरसोबाच्या वाडीला कृष्णा-पंचगंगा संगमावर स्नान करून भीमा अमरजा संगमावर आह्निक करून मठात भिक्षा स्विकारतात व तेथेच राहतात.

औदुंबरा तळवटी नृसिंह योगी।

कृष्णातटी परमशांत सुखास भोगी।

ध्यानस्थ होवोनी समस्त चरित्र पाहे।

अनन्य जो शरण इच्छित देत आहे॥

Contact us
If you are interested or have any questions, send us a message.
I am very interested
Send Message